मालमत्ता कराविरोधात कळंबोलीत मूक मोर्चा

पनवेल : पालिका क्षेत्रात नागरीकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी मालमत्ता कर भरावाच लागेल असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केल्यानंतर आता मालमत्ता कराला होणारा विरोध वाढला आहे. बुधवारी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली कळंबोली वसाहतीत मूक मोर्चा काढत पालिकेचा निषेध करण्यात आला. तर खारघर येथील ग्रीन फिंगर ग्लोबल स्कूलच्या आवारात महापालिकेने घेतलेल्या सुनावणीत खारघरवासीयांनी गोंधळ घातला.

कळंबोली वसाहतीमध्ये बुधवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास करावली चौकातून नागरिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अशा 200 नागरिकांनी मूक मोर्चा काढला. या वेळी पालिका प्रशासनाचा कराविरोधात निषेध व्यक्त केला. यात महिलांचाही मोठा सहभाग होता. एका मोठ्या फलकावर मालमत्ता कराला विरोधाची घोषवाक्य लिहून हा फलक घेऊन आंदोलक मोर्चात सहभागी झाले होते. करावली चौकातून सुरू झालेला मोर्चा एलआयजी या बैठ्या वसाहतीच्या मुख्य रस्त्यावरून वसाहतीमध्ये काढण्यात आला. या वेळी मालमत्ता कराविरोधात भाजपने सामान्य नागरिकांच्या खिशाला ऐन करोनाकाळात लावलेल्या कात्रीमुळे सिडकोवासीय बेजार झाले असल्याचा आरोप करण्यात आला. शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्यासह पालिकेचे विरोधी पक्षगटनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, गोपाळ भगत, रवींद्र भगत, शिवसेनेचे पदाधिकारी शिरीष घरत, रामदास शेवाळे, प्रदीप ठाकूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

  • हरकती व सूचनांच्या सुनावणी वेळी गोंधळ
    खारघर सेक्टर 12 मधील ग्रीन फिंगर शाळेच्या आवारात पालिकेने सुनावणी आयोजित केली होते. यात सुमारे 1600 जणांनी हरकती नोंदविल्या, तर 4000 नागरिकांनी ईमेलवरून हरकती नोंदविल्या आहेत. दिवसाला सुमारे 200 हरकतीदारांना बोलावण्यात आले होते. सामान्य नागरिकांच्या बाजूने सात वकिलांचे पथक येथे खारघर फोरमच्यावतीने व नगरसेविका लीना गरड यांनी तैनात केले होते. 
    पालिकेचे उपायुक्त सचिन पवार हे केंद्रावर एकटेच होते. त्यामुळे लिपिकांद्वारे सुनावणी, कशी घेतली जाणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर सरकारी कामात अडथळा घालत असल्यावरून काही काळ वाद झाले. अधिकारी कोणतेही हरकत ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसून नागरिकांचे सर्व मुद्दे खोडून काढून कर हा भरावाच लागणार या मतावर ठाम होते. त्यामुळे एकतर्फी सुनावणी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.