432 पोटँशिअल सुपरस्प्रेडर्सचे लसीकरण

नवी मुंबई ः ज्यांचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येतो अशा कोव्हीडदृष्ट्या जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींच्या लसीकरणाकडे लक्ष दिले जात असून त्यांच्याकरिता विशेष लसीकरणाच्या सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये गुरुवारी विविध सेवा पुरविणार्‍या 432 व्यक्तींनी महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली रूग्णालयांत कोव्हीड लसीकरणाचा लाभ घेतला.

यामध्ये रेस्टॉरंटमधील 102 कर्मचारी, पेट्रोल पंपावरील 56 कर्मचारी, 117 सोसायटी वॉचमन, सलून / ब्युटी पार्लरमधील 21 कर्मचारी तसेच 136 रिक्षा व टॅक्सी ड्रायव्हर यांनी कोव्हीड लस घेतली.   

कोव्हीड लसीकरण करताना लसींच्या उपलब्धतेनुसार महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशाप्रमाणे योग्य प्रकारे नियोजन केले जात असून 45 वर्षावरील नागरिकांप्रमाणेच दैनंदिन कामकाजात नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येणार्‍या केमिस्ट, मेडिकल स्टोअर्स, रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पंप याठिकाणी काम करणारे कर्मचारी तसेच रिक्षा-टॅक्सी चालक, सोसायट्यांचे वॉचमन यांचे लसीकरण केले जात आहे. त्यामध्ये यापुढील काळात टोल नाक्यांवरील कर्मचारी तसेच स्विगी, झोमॅटो, कुरिअर अशा सेवा पुरविणारे कर्मचारी आणि अशा प्रकारच्या इतर घटकांचे लसीकरण करण्यात येत आहे.