सीसीटीव्हीसाठी नवीन सल्लागार

31 जुलैपर्यंत होणार नवीन अंदाजपत्रक

नवी मुंबई ः 240 कोटींची सीसीटीव्हीची निविदा आयुक्त बांगर यांनी रद्द केल्यानंतर नवीन निविदा प्र्रक्रीया राबविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक आयुक्तांनी केली आहे. सल्लागार म्हणून मे.अर्नस्ट आणि यंग या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून अंदाजपत्रक बनविण्यापासुन ते निविदाप्रक्रीया पूर्ण करण्यापर्यंत सल्लागार पालिकेला तांत्रिक मदत करणार आहेत. आयुक्तांच्या या निर्णयाचे शहर अभियंता विभागाने स्वागत केले आहे.

नवी मुंबईत 1400 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 80 हायस्पीड कन्ट्रोल कॅमेरे लावण्यासाठी गेली 4 वर्षे पालिका निविदा प्रक्रीया राबवित आहे. यापूर्वी सल्लागार केपीएमजी या कंपनीने बनविलेले अंदाजपत्रक आणि तांत्रिक डाटावर ही निविदा प्रक्रीया राबविण्यात आली होती. परंतु वेळोवेळी त्यामध्ये बदल होत गेल्याने निविदेचा खर्च वाढत गेला. पालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेला 270 कोटींचा देकार इच्छूक ठेकेदारांकडून आला होता. त्यामुळे नव्याने प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेण्याच्या फंदात न पडता आयुक्त बांगर यांनी निविदा प्रक्रीया रद्द करून नवीन तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर वापरून निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश शहर अभियंता विभागाला दिले आहेत. शहर अभियंता संजय देसाई यांनी याकामी सल्लागार म्हणून मे. अर्नस्ट आणि यंग या कंपनीची नियुक्ती केली आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक, निविदा प्रक्रीया राबविणे, प्राप्त देकारांचा अभ्यास करून अहवाल सादर करणे तसेच कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंपनीला देण्यात आली आहे. याकामी सल्लागाराला सुमारे 2 कोटी रूपये सल्लागार शुल्क म्हणून देण्यात येणार आहे. नविन सल्लागारांच्या नियुक्तीनंतर कामाचे अंदाजपत्रक 150 कोटींपर्यंत राहण्याची शक्यता शहर अभियंता विभागाने वर्तविली आहे.

पालिका आयुक्त यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारावर हे काम करण्याचा निर्णय घेतल्याने नविन सल्लागारामार्फत ही निविदा प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. या कामाचा दर्जा अत्यूच्च असून नवी मुंबईकरांच्या व पोलिसांच्या भविष्यातील गरजांचा विचार करून नव्याने अंदाज पत्रक बनविण्यात येणार आहे. - संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका