वाशी खाडी पुलावरुन आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई : वाशी खाडी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत कोळी बांधवांच्या मदतीने या व्यक्तीचे प्राण वाचवले. सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवी मुंबईत राहणारी संबंधित व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले होते. नेरुळ भागात राहणार्‍या या व्यक्तीने वाशी खाडी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

वाहतूक पोलिस शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीला पाहिले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करत धाव घेतली. त्यानंतर कोळी बांधवांच्या मदतीने या व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले. दरम्यान, पालिका रुग्णालयात संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.