लसीचे 66 कोटी डोस उपलब्ध होणार

केंद्राने दिली आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर

नवी दिल्ली ः केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणखी लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर ठरणार आहे. लवकरच देशाला लसींचे 660 दशलक्ष अर्थात 66 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे तब्बल 14 हजार 505 कोटी किमतीचे डोस भारत सरकारने मागवले आहेत. ज्यामुळे देशातल्या लस उपलब्धतेत वाढ होणार आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशात 135 कोटी डोस उपलब्ध करुन देण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे. ते समोर ठेवूनच ही ऑर्डर देण्यात आली आहे. या 66 कोटी डोस व्यतिरिक्त सरकारने कोर्बेवॅक्स या लसीचे 30 कोटी डोस आगाऊ रक्कम देऊन राखीव ठेवल्याची माहिती काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.याचाच अर्थ ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशात एकूण 96 कोटी डोस उपलब्ध होणं अपेक्षित आहे. हे डोस केंद्राच्या 75 टक्क्यांच्या वाट्यामधले असतील. या व्यतिरिक्त खासगी क्षेत्रामध्ये या कालावधीत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे 22 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत.

लसींचा तुटवडा भासत असल्याची तक्रार अनेक राज्यांनी गेल्या काही दिवसांत पुन्हा सुरू केली होती. लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रेही बंद करावी लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने ही मोठी ऑर्डर दिली आहे. दरम्यान, वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकनेही आपली उत्पादन क्षमता वाढवली आहे.