मसाला आणि धान्य बाजारात शुकशुकाट

नवी मुंबई : संपूर्ण देशात शुक्रवारी डाळ व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला. त्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने आपला सहभाग देत मार्केटमधील धान्य व मसाला मार्केट कडेकोट बंद ठेवले. मार्केट बंद असल्याने शेतकर्‍यांना मोठं नुकसान सहन करावे लागले.

केंद्र शासनाने डाळवर्गीय शेतीमालासाठी साठवण मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे किरकोळ व्यापार्‍यांना पाच टन, तर घाऊक व्यापार्‍यांना 200 टन इतकाच डाळींचा साठा करता येणार आहे. या निर्णयाविरोधात राज्यात 16 जुलै रोजी बाजार समित्या एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे काटेकोरपणे पालन देशातील बाजार समितीमधील डाळ व्यापार्‍यांनी केले. या बंदचा परिणाम नवी मुंबईत ठळकपणे दिसून आला. डाळींच्या किमती वाढत असल्याने ग्राहक नाराजी व्यक्त करत असून त्या पार्श्वभूमीवर डाळ आयातीचा निर्णय सरकारने घेतला. सोबतच किरकोळ आणि घाऊक व्यापार्‍यांना डाळ साठवणुकीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली. त्यामुळे व्यापार्‍यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ग्रोमा संस्थेला नियमित केंद्र सरकार विविध धोरणांबाबत विश्वासात घेत. मात्र, यावेळी सरकारने अशाप्रकारे थेट निर्णय जाहीर केल्याने बाजारातील व्यापार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिवाय या व्यापार्‍यांच्या राज्याच्या संघटनेने घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे आज पालन मुंबई बाजार समितीने केल्याचे पाहायला मिळाले.