वाशीमधील झाडांची छाटणी धीम्यागतीने

पावसाळयात अपघात होऊन जीवीत व वित्तहानी होण्याची शक्यता

नवी मुंबई : वाशीमधील अनेक ठिकाणी छाटणी अभावी झाडांच्या फांद्या रस्त्यावर तसेच पदपथांवर लोंबकळत आहेत. पादचार्‍यांना तसेच वाहनचालकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अस्ताव्यस्त वाढलेल्या या फांद्यांमुळे पावसाळयात अपघात होऊन जीवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे पावसाळ्यापूर्वी रस्त्यालगत असणार्‍या झाडांची छाटणी करण्यात येते. वाशी विभागामध्ये वृक्ष छाटणीचे काम सुरू असून काही प्रमाणात झाले आहे.  कोविड सारख्या महामारीच्या काळात सुद्धा या विभागाचे कर्मचारी करत आहेत. परंतू, कमी मनुष्यबळामुळे हे काम धीम्यागतीने सुरू आहे. 2016 च्या वृक्षगणनेनुसार वाशी विभागमध्ये एकूण 98,100 झाडे आहेत. त्यानुसार सुबाबुळ व गुलमोहराच्या झाडांची संख्या जास्त आहे. या झाडांची मुळे खोलवर रूजत नसल्याने वादळवार्यामध्ये या झाडांच्या पडझडीचे प्रमाण अधिक आहे.  

पावसाळ्यामध्ये अनेकवेळा सोसायटी आवारातील, पदपथावरील  तसेच रस्त्यालगत असलेल्या झाडांची पडझड होते. त्यामुळे पावसाळ्या अगोदर ही छाटणी होणे गरजेचे असते. विभागातील एकूण  सुमारे 1000 वृक्षांची छाटणी करण्यात आली आहे. यामध्ये 100 धोकादायक वृक्षांचा समावेश आहे. सोसायटी आवारामधील झाडांच्या छाटणीची जबाबदारी ही त्या सोसायटीची असते. त्यासाठी महानगरपालिकेची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत वृक्ष छाटणीसाठी सी विभागाकडे सुमारे 250 अर्ज आले आहेत. त्यातील 220 अर्जांना परवानगी देण्यात आली आहे.

तौक्त वादळामुळे नवी मुंबई शहरातील 122 तर वाशीमध्ये 44 वृक्ष उन्मळून पडले आहेत. झाडांच्या पडझडीमध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. झाड कोसळून संरक्षण भिंती पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे जीवीत व वित्तहानी टाळण्यासाठी महापालिकेने पदपथावरील व रस्त्यालगत असणार्‍या झाडांची छाटणी जलदगतीने करावी तसेच सोसायटी आवारातील धोकादायक व इतर झाडांची छाटणी करण्यासाठी महापालिकेने सोसायटींना तशा सूचना कराव्या अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

   महापालिकेने संयुक्तरित्या मोहिम राबवावी

   कोविड महामारीच्या काळात झाडांच्या छाटणीसाठी मनुष्यबळ कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच सोसायटींकडे छाटणीकरीता अद्यावत यंत्रणेची कमतरता असल्याने महापालिकेने संयुक्तरित्या मोहिम राबवून वृक्षछाटणीच्या कामाला गती द्यावी. - प्रकाश पाटील, समाजसेवक, वाशी

   • तौक्ते वादळामुळे उन्मळून पडलेली वृक्ष
   • शहरात - 122
   • वाशी विभागात - 44
   • 2016 च्या वृक्षगणनेनुसार  शहरातील वृक्षाची संख्या 8,57,295