नवी मुंबईलाही पावसाने झोडपले

नवी मुंबई : राज्यभरात पावसाने थैमान घातले असून नवी मुंबईलाही झोडपून काढले आहे.  शहरात 200.88 मिमी पावसाची 12 तासांत नोंद झाली आहे. एकूण 1455.44 मिमी पावसाची नोंद झाली. दोन दिवसाच्या पावसाने अनेकांचे नुकसान झाले असून जनजिवन विस्कळीत झाले आहे. सखल भाग पाण्याखाली  गेला असून काही भागात दुर्घटना घड्या मात्र यात जीवतहानी झालेली नाही. 

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यभरात पर्यटन स्थळांवर बंदी घातली असताना हौशी पर्यटक पोलीसांना हुलकावणी देऊन पर्यटनस्थळी जातात. बंदी असतानाही मुसळधार पावसात धबधब्यावर गेलेल्या व तेथेच अडकलेल्या 116 पर्यटकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. खारघरमधील हे पर्यटक आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे सर्व पर्यटक खारघरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकासाठी गेले होते. मात्र पावसामुळे डोंगरातून वाहणार्‍या ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे हे सर्व पर्यटक धबधब्याजवळ अडकले होते.

यामध्ये 78 महिला, 38 पुरुष आणि 5 लहान मुलांचा समावेश होता. या सर्वांना लेडरच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. रविवार असल्याने खारघरमधील डोंगराळ भागात पर्यटकांनी गर्दी केली होती. बंदीचे आदेश असतानाही पर्यटक अशा ठिकाणांवर गर्दी करत आहेत. बंदी आदेश झुगारून पर्यटक डोंगराळ भागात गेले होते. दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात खारघरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खारघर सेक्टर 5 येथील धबधब्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारा ओढा दुतर्फी वाहू लागल्याने, पर्यटक धबधब्यावर अडकले. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास खारघर अग्निशमन जवानांनी जवळपास 116 पर्यटकांना ओढ्यावर सीडी लावून सुखरूप बाहेर काढले.

नवी मुंबई, पनवेल परिसरात मुसळधार पावसामुळे सखल भाग पाण्याखाली गेला आहे. कोरोडो रुपये खर्च करून बनवलेल्या गोल्फ कोर्सही पाण्याखाली गेला आहे. पांडवकडा आणि डोंगरातून येणारे पाणी थेट गोल्फ कोर्समध्ये शिरलं. त्यामुळे गोल्फ कोर्सला तलावाचे स्वरूप आले आहे. नवी मुंबईत शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पहाटे सहावाजेपर्यंत पाऊस सुरू होता. आजही नवी मुंबईला पावसाने झोडपून काढलं आहे. शहरात एका ठिकाणी भिंत कोसळली. यामध्ये कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. तसेच पाच ठिकाणी झाडे कोसळली. तर नऊ जागी ठिकाणी सखल भागात पाणी साचले. एक शॉर्टसर्किट तर एक गॅस लिकेजची घटना घडली.

मोरबेत 1481.90 मिमी पावसाची नोंद
नवी मुंबई महापालिकेच्या स्वतःच्या असलेल्या मोरबे धरण क्षेत्रात 167.80 मिमी तर एकूण 1481.90 मिमी पावसाची नोंद झाली. मोरबे धरणाची पातळी 76.84 मीटरपर्यंत पोहोचली आहे. शहरात सर्वाधिक पाऊस कोपरखैरणे विभागात 211.50 मिमी, बेलापूर विभागात 201.20, नेरूळ 197.20, वाशी 193.90 तर ऐरोलीत 190.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे.