पनवेलमध्ये पुरसदृश परिस्थिती

पनवेल ः पनवेल परिसरात दुसर्‍या दिवशी सोमवारी देखील पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पनवेल शहर, खांदा कॉलनी, कळंबोली,खारघर आदींसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.मागील 24 तासात 284 मिमी पावसाची नोंद एकट्या पनवेल तालुक्यात करण्यात आली आहे. 

सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने सायन पनवेल महामार्ग,कळंबोली मुंब्रा हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने गाड्या पाण्यात अडकल्या आहेत. गाढी आणि कासाडी या दोन्ही नद्या दुथडी वाहत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना घडत आहेत. कळंबोली वसाहत तुंबली असून बैठ्या घरांमध्ये पाणी घुसून अनेकांचे नुकसान झाले. 

आपत्ती व्यवस्थापनाची ऐसी की तैसी
कळंबोली वसाहत भरल्यानंतरही ना सिडको दिसली ना महापालिका, त्यामुळे कळंबोलीकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. पाणी साचल्यानंतर त्याला वाट करून देण्याच्या अनुषंगाने दोन्ही यंत्रणांकडून कोणत्याही उपायोजना केल्या गेल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे कळंबोलीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.
वरवरची नालेसफाई पावसाच्या पाण्यात बुडाली
कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोने वरवरची नालेसफाई केली. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या अनुषंगाने याकडे अधिकार्‍यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबून ठीकठिकाणी पाणी साचले. जनजीवन विस्कळीत झाले. याला नेमके जबाबदार कोण, ही सगळी नुकसानभरपाई सिडको देणार आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.