डुंगी गाव जलमय

उरण ः मुसळधार पडणार्‍या पावसाने राज्यभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पनवेल, उरण भागात पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. विमानतळ परिसरातील डुंगी गाव जलमय झाले आहे. सिडकोच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सिडकोमार्फत सुरु आहे. विमानतळासाठी सिडकोने परिसरातील गावांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. तसेच परिसरातील नदीचा प्रवाह वळविला असल्याने पावसाचे पाणी जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने डुंगी गाव आजच्या घडीला जलमय झाले आहे. सिडकोच्या चुकीच्या नियोजनामुळे दरवर्षी गावात पाणी साचत आहे. गेले चारवर्षापासून ही परिस्थिती असूनही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. तसेच नुकसान भरपाईही दिली जात नाही. विमानतळासाठी सिडकोने नदीचा नैसर्गिक प्रवाह वळविला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी पर्यायी जागाही उपलब्ध नसल्याने नदीसह पावसाचे पाणी डुंगी गावात शिरते. त्यामुळे गाव दरवर्षी जलमय होते. सतत दोन दिवस पडत असलेल्या पावसाने गावात पुरसदृश्य परिस्थिती उद्धवली आहे. पाणी उपसा करण्यासाठी सिडकोने 12 मोटर व सेक्शन पंप लावले आहेत. मात्र तरीही पाणी जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.