नवी मुंबईत तीन आत्महत्या

नवी मुंबई ः घणसोली आणि जुईनगर या भागात शनिवार आणि रविवार या दोन दिवसात तीन व्यक्तींनी वेगवेगळ्या कारणावरुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे घणसोलीत एकाच इमारतीत राहणार्‍या दोन व्यक्तींचा यात समावेश आहे. 

घणसोलीतील ज्ञानेश्वर अपार्टमेंटमध्ये तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या अनिल वसंत बोराडे (38) या व्यक्तीने नोकरी गेल्याने आलेल्या नैराष्येतून शनिवारी दुपारी राहत्या घरातील खिडकीस ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिलच्या भावाने दरवाजा तोडून अनिलला वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेपाठोपाठ रविवारी दुपारी त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणार्‍या उत्तम लक्ष्मण कदम (47) यांनी देखील राहत्या घरात किचनमध्ये फँनच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी उत्तम कदम यांच्या मुलाने त्यांना तत्काळ महापालिकेच्या रुग्णालायत दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. उत्तम कदम यांच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश गोरे यांनी सांगितले. या दोन्ही घटनांची रबाळे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनांचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 

या घटनेप्रमाणे रविवारी सायंकाळी जुईनगर सेक्टर-23 मध्ये राहणार्‍या वेंकटदास सुदर्शन पेरला (51) या व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकिस आले आहे. वेकंटदास यांनी आतुन दरवाजा बंद केल्याने शेजार्‍यांनी दरवाजा तोडून त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. वेंकटदास बिपी, शुगर या आजाराने त्रस्त होते. ते एकटे राहण्यास असल्याने ते मानसिक आजाराने व एकटेपणाला कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. नेरुळ पोलीस ठाण्यात या घटेनची नोंद करण्यात आली आहे.