आ. गणेश नाईकांचा अतिवृष्टी बाधितांना मदतीचा हात

नवी मुंबई ः सतत दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबईतील जनजीवनही विस्कळीत केले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काहींच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. अशा अतिवृष्टीने बाधित नागरिकांची आमदार गणेश नाईक यांनी सोमवारी भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. त्यांना मदतीचा हात दिला. 

दोन दिवस मुसळधार पावसामुळे सोमवारी मुंबईतील अनेक रहिवासी भागातील घरे पाण्याखाली गेेली. घरांमध्येच नागरिक अडकून पडले. त्यांना बाहेरही पडता येत नव्हते. अशा आपत्ती काळात आमदार गणेश नाईक यांनी सोमवारी नवी मुंबईतील विविध पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली. अतिवृष्टीने बाधित नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. जेथे गरज आहे त्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सुचना नाईक यांनी संबधित प्राधिकरणांच्या अधिकार्‍यांना केल्या आहेत. भर पावसात स्वतः आ.नाईक यांच्यासोबत माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक हे पाहणीप्रसंगी उपस्थित होते. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुसळधार पावसामुळे बाधित नागरिकांना मदत करण्याचे आवाहन नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.