अध्यात्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची वारकरी समाजाची मागणी

पनवेल : अध्यात्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्याची समस्त वारकरी समाज महाराष्ट्र राज्य यांची मागणी आहे. या संदर्भातील निवेदन पनवेल येथील प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले.

पायी वारी आषाढी 2021 व महाराष्ट्रातील देव व संतांचे सोहळे मंदिरे आणि समाजाचे सांस्कृतिक जीवनमान उंचावणार्‍या अध्यात्मिक कार्यक्रमांवर कोरोनामुळे बंदी घालण्यात आली आहे. समाजातील अध्यात्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक व सामाजिक जीवनाचे दर्शन संतांच्या मुळे घडत आहे. त्यामुळे देव-देवतांच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी समस्त वारकरी समाजाची आहे. पुढील काळात देव व संतांचे सोहळे, अध्यात्मिक समारंभ कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रातिनिधिक स्वरूपात जर सरकारने संपन्न होऊ दिले नाहीत तर वारकर्‍यांच्या वतीने व्यापक उग्र स्वरूपात सत्याग्रह केला जाईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी वारकरी समाजातील मंडळी यांनी प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले, तहसीलदार विजय तळेकर यांना निवेदन दिले.