अंथरुणाला खिळलेल्यांसाठी घरोघरी लसीकरण

नवी मुंबई : जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी महापालिकेकडून विविध क्षेत्रातील घटकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेत. पालिका प्रशासनाने आता अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी त्यांच्या घरी जाऊन लस देण्याचे ठरविले आहे. याचे नियोजन पूर्ण झाले असून लवकरात लवकर ही मोहीम सुरू होईल, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

जानेवारीपासून करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन करीत जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शासनाकडून उपलब्ध लस साठ्यानुसार शहरात लसीकरण सुरू आहे. मात्र लसच उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने जसा साठा उपलब्ध होईल तसे नियोजन करीत आतापर्यंत पहिली व दुसरी मात्रा मिळून 8 लाख 11 हजार 159 जणांना लस दिली आहे. हे लसीकरण करताना वंचित घटकांसह शहरात संसर्ग पसरवू शकणार्‍या घटकांना प्राधान्य देत लसीकरण केले आहे. यात अपंगांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण करण्यात येत आहे. तर शहरातील बेघरांसाठी प्रशासनाने त्यांच्या जागेवर जात त्यांना लस दिली आहे. त्यानंतर शहरात जास्तीत जास्त संपर्कात असलेल्या घटकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवत आहे.

आता पालिका प्रशासनाने अंथरुणाला खिळलेल्या व घरातून बाहेर पडू न शकणार्‍या नागरिकांसाठी घरोघरी लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी संबंधित अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांची पालिका हेल्पलाइनद्वारे माहिती घेत संबंधित डॉक्टरांकडून व त्यांच्या कागदपत्रावरून खात्री करून घेतल्यानंतर अशा व्यक्तींसाठी त्यांच्या घरी जाऊन लस दिली जाणार आहे. 23 नागरी आरोग्य केंद्रांमार्फत ज्या नागरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात असे रुग्ण आहेत, त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी त्या नागरी आरोग्य केंद्रांना देण्यात आली आहे. तसेच लस वाया जाऊ नये म्हणून दुपारनंतरच लसीकरण करण्याचे ठरविले आहे.