टारगेटेड टेस्टींगला सहकार्य करा

तिसरी लाट लांबविण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन

नवी मुंबई ः युरोपसह अनेक देशांमधील कोव्हीडच्या स्थितीचा अभ्यास करता कोव्हीडची तिसरी लाट येणार हे गृहीत धरूनच उपाययोजना करणे गरजेचे असून जितक्या दूरच्या कालावधीपर्यंत ही संभाव्य तिसरी लाट लांबविता येईल तितकी हानी कमी होईल. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोव्हीड टेस्टींग विषयी कोणतीही साशंकता न बाळगता नागरिकांनी टारगेटेड टेस्टींग मोहीमेला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन समाज माध्यमांव्दारे प्रसारित केलेल्या नागरिक सुसंवादामध्ये केलेले आहे.

तिसरी लाट येणार असेलच तर तिला प्रतिरोध करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे कोव्हीड लसीकरण करणे हा एक उपाय आहे. याव्दारे तिसर्‍या लाटेपासून होणार्‍या हानीची तीव्रता कमी करता येईल. लसीकरणाप्रमाणेच तिसरी लाट लांबविण्यासाठी करावयाची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोव्हीड टेस्टींग असून जास्तीत जास्त प्रमाणात टारगेटेड टेस्टींग करून कोरोनाच्या विषाणूला आपण आहे त्याच ठिकाणी रोखू शकलो तर त्याचा पुढील प्रादुर्भाव रोखला जाईल आणि मिशन ब्रेक द चेन खर्‍या अर्थाने यशस्वी होईल. हीच बाब राज्य टास्क फोर्स तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञांनी वेळोवेळी अधोरेखीत केलेली असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका मागील 1 महिन्यापासून टारगेटेड टेस्टींगचे धोरण राबवित असून त्यानुसार कोणत्याही इमारतीत अगदी 1 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला तरी त्या इमारतीस हॉटस्पॉट जाहीर करून तेथील सर्व रहिवाशांचे टेस्टींग केले जात आहे. याकरिता संबंधित महापालिका नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दैनंदिन कार्यवाही करण्यात येत असून त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉटमध्ये टेस्टींग कॅम्प घेण्यात येत आहे. तेथे अँटिजेन टेस्टप्रमाणेच प्राधान्याने कोमॉर्बिड, ज्येष्ठ नागरिक, कोरोना सदृष्य लक्षणे असणार्‍या व्यक्ती यांची आरटी-पीसीआर टेस्टही करण्यात येत आहे. महानगरपालिकेची स्वत:ची अत्याधुनिक लॅब असल्याने 24 तासात तपासणी अहवाल मिळत आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. हॉटस्पॉट क्षेत्रातील टारगेटेड टेस्टींग जलद रूग्णशोधासाठी व कोव्हीडला आहे तिथेच रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कोव्हीड टेस्टींग करण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात अग्रभागी असून 15 लाख लोकसंख्येच्या तुलनेत 13 लाखाहून अधिक टेस्टींग झालेले आहे.