15 दिवसात 22 लक्ष 88 हजार दंड वसूल

नवी मुंबई ः नवी मुंबईत तीसर्‍या स्तरातील निर्बंध सुरु असून त्यानुसार दुकाने व आस्थापना यांना सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र निर्धारित कालावधीनंतरही दुकाने / आस्थापना सुरू ठेवून आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात पालिकेच्या दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणार्‍यांकडून गेल्या 15 दिवसात 22 लक्ष 88 हजार दंड वसूल दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

10 जुलैपासून मागील पंधरवड्यात 31 विशेष दक्षता पथकांनी तसेच 8 विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी 2442 व्यक्ती / दुकानदार यांच्यावर मास्क, सुरक्षित अंतर, थुंकणे त्याचप्रमाणे 4 वा. नंतर दुकाने / आस्थापना सुरू ठेवणे अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करीत 22 लक्ष 88 हजार 300 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. सेक्टर 30 ए, वाशी येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स पबवर 24 जुलै रोजी रात्री 11 वा. कारवाई नंतर करण्यात आली असून रू. 50 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. 

नवी मुंबई महानगरपलिकेच्या दक्षता पथकांनी 29 एप्रिल 2020 पासून कोव्हीड वर्तन नियमांचे उल्लंघन करणार्‍या 70583 व्यक्ती / आस्थापना यांच्याकडून 3 कोटी 56 लक्ष 59 हजार 150 मात्र इतक्या रक्कमेचा दंड वसूल केलेला आहे. यामध्ये मास्कच्या कारवाईपोटी 29943 व्यक्तींकडून 1 कोटी 50 लक्ष 18 हजार, सुरक्षित अंतर व वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 2804 आस्थापनांकडून 1 कोटी 16 लक्ष 44 हजार 900 आणि सुरक्षित अंतर नियमाचे उल्लंघन केल्यामुळे 36776 व्यक्तींकडून 78 लक्ष 56 हजार 650 आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यामुळे 1160 व्यक्तींकडून 11 लक्ष 39 हजार 600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.