219 हेक्टर कांदळवन वन विभागाकडे येणार

सिडको करणार लवकरच हस्तांतरण

नवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकरिता, महामंडळाच्या ताब्यातील 219 हेक्टर कांदळवन क्षेत्र राज्य वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, रायगड यांच्या मार्फत सदर कांदळवन क्षेत्र वन विभागाला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. 

मुंबई महानगर प्रदेशातील कांदळवनांचे राखीव वने म्हणून संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, संबंधित प्राधिकरणांकडून आपापल्या अखत्यारीतील कांदळवन क्षेत्रांचे वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरण करण्यात येत आहे. यानुसार, सिडकोकडून नवी मुंबई प्रकल्प अधिसूचित क्षेत्रातील, पनवेल तालुक्यातील मौजे कामोठे आणि मौजे पनवेल येथील एकूण 219 हेक्टर कांदळवन क्षेत्रही वन विभागाला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सिडकोने जिल्हाधिकारी, रायगड यांच्याशी पत्र व्यवहार केला असून जिल्हाधिकारी, रायगड यांच्याकडून 27 जुलै 2021 रोजी सिडकोच्या कांदळवन क्षेत्राचा ताबा घेण्यात येऊन, त्यानंतर हे क्षेत्र वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात पनवेल आणि उरण तालुक्यांतील काही कांदळवन क्षेत्रे, कांदळवन कक्षाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.  

सिडकोने नेहमीच पर्यावरणपूरक विकासाचा आपल्या धोरणाद्वारे पुरस्कार केला आहे. या धोरणाला अनुसरूनच नवी मुंबईतील कांदळवनांच्या संरक्षण व संवर्धनाकरिता, सिडकोच्या ताब्यातील 219 हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  - डॉ. संजय मुखर्जी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको