राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचे बंधु प्रविण गावडे यांचा भाजपात प्रवेश

नवी मुंबई ः राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचे सख्खे बंधू प्रवीण गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अशोक गावडे यांना धक्का बसला आहे. स्थानिकांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपशी एकनिष्ट राहून रहिवाशांना न्याय देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या अशोक गावडे यांच्या राजकारणाला तसेच श्री गणेश सोसायटीतील पराकोटीच्या अंतर्गत वादाला कंटाळून सोसायटीच्या विकासासाठी, स्थानिकांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रविण गावडे यांनी भाजपा प्रवेश केल्याचे सांगितले. सध्या सुरु असलेली अन्यायी भुमिका खोडून काढण्यासाठी ते अखेर जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, आमदार गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक नेतृत्व मंगल घरत यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दाखल झाले. नवी मुंबईतील खाजगी संस्थांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या दप्तरी रेंगाळत पडलेला असतानाच श्रीगणेश सोसायटीतील रहिवाशी व नागरिकांनी आपल्या न्याय हक्कासाठी कित्येक लढे व आंदोलने केलेली आहेत. आमचे बंधु नुसतेच राजकारण करत आले आहेत. सर्वसामान्यांवर होणारा अत्याचार आणि अन्याय नुसतंच पहात बसणं माझ्या स्वभावात नाही. त्यामुळे तेथे सध्या असलेली मुजोरी आणि अन्यायी भूमिकेविरुद् लढण्यासाठी भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करत राहणार आहे, असे वक्तव्य प्रविण गावडे यांनी केले आहे.