अनोंदीत कामगारांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

नवी मुंबई ः एपीएमसी बाजारातील भाजीपाला व फळ मार्केट आवारात मोठया प्रमाणात 27 जुलै 2021 पासून अनोंदीत कामगारांना प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र अचानक घोषित केलेल्या निर्णयामुळे व्यापार्‍यांनी आमचे नुकसान होऊन कामाचा खोळंबा होईल त्यामुळे अशा अनोंदीत कामगारांची लवकरच नोंद करून घेऊ, अशी गळ युनियनकडे घातल्याने तूर्तास या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. 

एपीएमसीमध्ये अनोंदीत कामगार बेकायदेशीररित्या माथाडीची कामे करीत आहेत. त्यामुळे माथाडी कायद्याची पायमल्ली होत आहे. त्यामुळे अनोंदीत कामगारांना मार्केटमध्ये प्रवेश बंदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व व्यापार्‍यांनी त्यांच्याकडे काम करत असणार्‍या अनोंदीत कामगारांची मुंबई भाजीपाला बाजार व असंरक्षित कामगार मंडळात नोंदणी करावी. या बाजार आवारातील अनोंदीत कामगारांनी देखील आपली स्वतःची कामगार नोंदणी शासनाच्या भाजीपाला मंडळात करावी. या दोन्ही घटकांनी मंडळात नोंदणी न केल्यास दोन्ही बाजारात अनोंदीत कामगारांना प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे मार्केट आवारात व्यापार्‍यांकडे कामगारांचा तुटवडा निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी व्यापार्‍यांचीच राहील असे परिपत्रक काढण्यात आले आहे. या कामागारांच्या नोंदणीसाठी व्यापारी आणि कामगारांनी मुदत वाढवून मागितली आहे. त्यामुळे सध्या प्रवेश बंदी स्थगित करण्यात आली आहे. 29 जुलै रोजी याबाबत बैठक बोलावुन पुढील भुमिका स्फष्ट केली जाणार असल्याचे कामगार संघटनेने सांगितले आहे. भाजीपाला बाजारात एक ते दीड हजार नोंदीत कामगार आहेत, तर या एक दोन महिन्यांत 550 कामगारांची नोंद करून घेतली आहे, उर्वरित 5%- 10% यांची नोंदणी लवकरच करून घेण्यात येणार आहेत अशी माहिती भाजीपाला संचालक शंकर पिंगळे यांनी दिली आहे.