‘खाकी’ची खांदेपालट

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 646 पोलिसांची बदली ; पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या कर्मचार्‍यांची बदली

नवी मुंबई : राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पनवेल आणि नवी मुंबईतील 646 पोलिस कर्मचार्‍यांची आयुक्तालयाच्या अंतर्गत बदली करण्यात आली आहे. 

पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष, पोलीस मुख्यालय, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, आरबीआय, अतिक्रमण आणि विशेष शाखेत कालावधी पूर्ण केलेल्या पोलिसांचा बदली प्रक्रियेत समावेश केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सर्व कर्मचार्‍यांचे सेवा पुस्तक तपासणीअंती पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या 646 कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात आली. त्यावर पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार या बदल्या बुधवारी रात्री पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी केल्या. 646 पोलिसांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई पदांच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यामध्ये 47 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 195 पोलीस हवालदार, 209 पोलीस नाईक, 195 पोलीस शिपाई कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

  • राज्य सरकारचा 25 % बदलीचा आदेश
     पोलीस आयुक्तांनी बदली केल्यानंतर 15 टक्के बदलीचा आदेश 25 टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. यामुळे पुन्हा उर्वरित 10 टक्के कर्मचार्‍यांच्या बदल्या येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी 150 ते 200 कर्मचार्‍यांची बदली होईल.