एपीजेय शाळेची चौकशी होणार

नवी मुंबई : नेरूळ येथील -एपीजेय स्कूल प्राचार्य आणि संस्था चालक यांनी पालकांकडून शाळा प्रवेशासाठी 1,22,201 रुपयांचा डीडी आणि 6457 रुपये ऑनलाईन घेतल्याची तक्रार पालकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली होती. या तक्रारीनुसार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी शाळेची चौकशी करून डोनेशन प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत शाळा प्रवेशासाठी डोनेशन घेणे फौजदारी गुन्हा आहे. पालक अजय तापकीर यांनी त्याची मुलगी कथा तापकीर हिच्या शाळा प्रवेशावेळी दिलेला डीडी आणि ऑनलाईन पेमेंट याची झेरॉक्स पुरावा म्हणून जोडला होता. एपीजेय स्कूल नेरूळमधील प्राचार्य आणि संस्था चालक यांच्यावर कायदेशीर कलमाअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून पालकांचे पैसे परत देण्याची मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज टेकाडे यांनी केली.