91 केंद्रांवर लसीचा पहिला डोस उपलब्ध

नवी मुंबई ः 30 जुलै रोजी 45 वर्षावरील नागरिकांकरिता लसीचा पहिला डोस उपलब्ध असल्याने नागरिकांना सुलभपणे लसीकरण करता यावे याकरिता आधीच्या 74 लसीकरण केंद्रांमध्ये अधिक 17 लसीकरण केंद्रांची भर घालत 91 लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. शुक्रवारी सर्वच विभागांतील लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली असल्याने 45 वर्षावरील नागरिकांनी उत्साहाने लसीचा पहिला डोस घेतला. या वाढविलेल्या 17 लसीकरण केंद्रांमध्ये 10 शाळा, 2 समाजमंदिर, 3 ज्येष्ठ नागरिक केंद्रे तसेच 1 रात्र निवारा केंद्र व 1 आर्ट ऑफ लिव्हींग केंद्र यांचा समावेश होता. 

45 वर्षावरील नागरिकांनीही सर्वच लसीकरण केंद्रांवर उत्साही उपस्थिती दर्शविली. बेलापूर विभागातील नमुंमपा शाळा क्र. 3 आग्रोळीगांव येथील लसीकरण केंद्रात पांडुरंग चव्हाण या 97 वर्षांच्या आजोबांनी लसीकरण करून घेतले. 91 लसीकरण केंद्रांमध्ये वाशी, नेरूळ, ऐरोली येथील सार्वजनिक रूग्णालये, तुर्भे येथील माता बाल रूग्णालय, वाशी सेक्टर 5 ईएसआयएस रूग्णालयातील जम्बो लसीकरण केंद्र त्याचप्रमाणे नागरी आरोग्य केंद्रांसह बेलापूर विभागात 10, नेरूळ विभागात 15, तुर्भे विभागात 14, वाशी विभागात 7, कोपरखैरणे विभागात 13, घणसोली विभागात 12, ऐरोली विभागात 10 व दिघा विभागात 4 लसीकरण केंद्रे कार्यान्वित होती. 

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लस उपलब्ध होईल त्यानुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येत असून पोर्टलवर दैनंदिन लसीकरणाची सविस्तर माहिती केंद्रांवर असलेल्या उपलब्ध डोसच्या संख्येसह आदल्या दिवशी संध्याकाळी प्रसिध्द केली जात आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अ‍ॅप अशा सोशल मिडियावरूनही दैनंदिन लसीकरणाची माहिती प्रसारित केली जात आहे.