प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक

प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; रॅली काढत नोंदविला निषेध

पनवेल : मुंबईतील एका कार्यक्रमात वेळ आली तर शिवसेना भवन तोडू असे वक्तव केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. पनवेलमधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी पनवेलच्या कळंबोली शहरात भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा, असे आव्हानदेखील  शिरसैनिकांनी यावेळी दिले. 

कळंबोली शहरात महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वात हे निदर्शन करण्यात आले. शिवसेना शाखेपासून ते कारमेल शाळेच्या चौकापर्यंत रॅली काढत हा निषेध नोंदवण्यात आला. तसेच लाड यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.   निषेध आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर असल्याने याचाच राग मनात धरून हे सर्व सुरु आहे. पाण्यातून मासा काढल्यावर तो जिवंत राहू शकत नाही तशी भाजपाची सत्तेतून दूर गेल्यावर परिस्थिती झालेली आहे. प्रसाद लाड तुम्ही कोण तुम्हात ? तुमची पार्श्वभूमी एकदा स्वतः तपासा. एकेकाळी तस्करी करणारी व्यक्ती, भूखंड घोटाळा करणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करण्यासाठी भाजपने त्यांना सोडले आहे, अशा शब्दांत पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी लाड यांच्यावर टीका केली. तसेच लाड यांची शिवसेनेवर टीका करण्याची लायकी नाही. ट्विटरवर टिवटिव करण्यापेक्षा तुमच्यात हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा, असे आव्हानदेखील शेवाळे यांनी दिले.

  • काय म्हणाले होते प्रसाद लाड ?
    भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत उद्धाटन करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमात बोलताना प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत. मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कुणी थांबणार नाही. सेनेच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत, असा इशारा प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिला होता.