363 घरकाम करणार्‍यांचे लसीकरण

नवी मुंबई ः सेवाकार्य करताना नागरिकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क येणार्‍या कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे. त्यामध्ये सोमवारी घरोघरी जाऊन स्वयंपाक, स्वच्छता असे घरकाम करणार्‍या 363 पॉटेंशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींचे पालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली रूग्णालयांत कोव्हीड लसीकरण करण्यात आले.

वाशी येथे 106, माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ येथे 180 तसेच राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली येथे 77 अशा एकूण 363 घरकाम करणार्‍या व्यक्तींनी कोव्हीड लस घेतली. ज्या प्रमाणात कोव्हीड लस उपलब्ध होतात त्यानुसार दैनंदिन लसीकरणाचे नियोजन केले जात असून ते करत असताना दैंनंदिन जीवनात विविध प्रकारचे सेवाकार्य करताना ज्या व्यक्तींचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतो अशा कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या पॉटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींकरिता विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे. 25 जूनपासून पॉटँशिअल सुपरस्प्रेडर्स असणार्‍या विविध घटकांचे लसीकरण केले जात असून आजतागायत मेडिकल स्टोअर्समधील 390 कर्मचारी, रेस्टॉरंटमधील 1407 कर्मचारी, सलून / ब्युटी पार्लर मधील 639 कर्मचारी, पेट्रोल पंपावरील 282 कर्मचारी तसेच 2323 रिक्षा-टॅक्सी चालक, 184 घरगुती गॅस वितरण करणारे कर्मचारी तसेच 1503 सोसायट्यांचे वॉचमन अशा 6728 पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये आज 363 घरकाम करणार्‍या व्यक्तींची भर पडलेली आहे. या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्समध्ये घरोघरी जाऊन स्वयंपाक, स्वच्छता आदी सेवा पुरविणार्‍या व्यक्तींचेही लसीकरण करण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार घरकाम करणार्‍या व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या 3 रूग्णालयांत विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.