सराईत कार चोर जेरबंद ; 82 लाखांच्या 13 कार जप्त

नवी मुंबई : शहरात वाहनचोरीच्या घटनात वाढ झाली असून पोलीसांची डोकेदुखीही वाढली आहे. यातील काही गुन्हे उघडकीस आणण्यास नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. संबंधित कारवाईत एकूण 13 कारसह 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी हे सराईत कारचोर असून त्यांच्या चौकशीतून आतापर्यंत 24 गुन्ह्यांची उकल झाली आहे. 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 14, ठाणे पोलीस आयुक्तालयात 5, मीरा भाईंदर 2, मुंबई 1, पिंपरी चिंचवड 1, राजस्थान 1 असे वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. नवी मुंबई पोलिसांनी कारचोरी संदर्भात घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीला पकडण्यात यश प्राप्त केले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहमद तौफिक हबिबूल्ला आणि राजेंद्र गुप्ता हे दोघे सराईत वाहन चोर आहे. त्यांनी अलीबाबा डॉट कॉम या संकेतस्थळावरुन 65 हजार किंमतीचे टूलकिट विकत घेतले होते. या टूलकिटचा वापर करुन बीएमडब्ल्यू, फॉरच्युनर, हुंदाई अशा परदेशी कंपन्यांची कोणतीही गाडी असो तो दहा मिनिटात चोरी करत असे.

आरोपी पार्क असणार्‍या कारचे दरवाजाचे काच फोडून दरवाजा उघडायचा. नंतर कारचे टूल बॉक्स ओपन करुन डी. सी. एम सर्किट डिस्कनेकट करायचा. त्यानंतर कारचे बोनट ओपन करुन सायरन मोड डिस्कनेकट करायचा. नंतर पुन्हा कारमध्ये जाऊन ओ.सी.एम सर्किट बनवायचा. त्यानंतर पुन्हा कारखाली उतरुन एक्सटर्नल वायरने बॅटरी ते फ्युज बॉक्स जोडायचा. त्यानंतर आधुनिक पद्धतीच्या टॅब वापरुन त्यास वायफाई कनेक्ट करुन वाहनांची स्विच ऑन/ऑफ कि वर चाबी ठेऊन कोड, डिकोड करायचा. यातून तो डुप्लिकेट चावी बनवायचा. नंतर एक्सटर्नल नट बॉक्स आणि बॅटर्‍या जोडलेले वायर काढायचा. नंतर डुप्लिकेट चावीने गाडी सुरु करुन वाहन चोरी करत असे. आरोपीकडून मारुती, स्विफ्ट डिजायर, सियाज, हुंदाई 120, फॉर्चूनर, इनोव्हा अशा एकूण 81 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.