एक वर्षात 4.5 लाखाहून अधिक आरटी-पीसीआर टेस्ट

नवी मुंबई ः कोव्हीड-19 विरोधातील लढाईमध्ये ‘मिशन ब्रेक द चेन’ ची प्रभावी अंमलबजावणी करीत कोरोनाचा प्रसार रोखण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयातील अद्ययावत आरटी-पीसीआर लॅबचा महत्वाचा वाटा आहे. या लॅबमध्ये मागील वर्षभरात 4 लक्ष 56 हजाराहून अधिक आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या वर्षभरात दसरा, दिवाळी अथवा इतर सण किवा शनिवार, रविवार वा सार्वजनिक सुट्टी अशी एकही दिवस न थांबता या लॅबने कोव्हीड टेस्टींगचे 365 दिवस अथक आणि अविश्रांत  काम केलेले आहे.

4 ऑगस्ट 2020 रोजी केवळ 11 दिवसांच्या विक्रमी कालावधीत कार्यान्वित करण्यात आलेल्या या आरटी-पीसीआर लॅबची आज यशस्वी वर्षपूर्ती होत असताना या लॅबमध्ये मागील वर्षभरात 4 लक्ष 56 हजाराहून अधिक आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या वर्षभरात दसरा, दिवाळी अथवा इतर सण किवा शनिवार, रविवार वा सार्वजनिक सुट्टी अशी एकही दिवस न थांबता या लॅबने कोव्हीड टेस्टींगचे 365 दिवस अथक आणि अविश्रांत काम केलेले आहे. 14 जुलै 2020 रोजी अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर 16 जुलैपासून अर्ध्या तासात पाहणी अहवाल प्राप्त होणार्‍या रॅपीड अँटिजेन टेस्टींगला मोठ्या प्रमाणात सुरूवात करण्यात आली, त्यासाठी केंद्रांची संख्या वाढ करण्यात आली तसेच मोबाईल टेस्टींगवर भर देण्यात आला. रॅपीड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची आरटी-पीसीआर टेस्टींग लॅब सुरु करण्याकडेही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. सेक्टर 15, नेरुळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आरटी-पीसीआर लॅबसाठी दुसर्‍या मजल्यावर 1800 चौफूट प्रशस्त जागेची निवड करणे, तेथे लॅबसाठी पूरक स्थापत्य-विदयुत व इतर पायाभूत सुविधा उभ्या करणे, लॅबकरिता आवश्यक यंत्रसामुग्री व उपकरणे बसविणे, ती कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर्स व कर्मचारी नियुक्त करणे तसेच लॅब सुरु करण्याठी गरजेच्या असलेल्या शासकीय परवानग्या मिळविणे अशा सर्वच गोष्टींच्या पूर्ततेसाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी युध्दपातळीवर काम सुरु करण्यात आले. केवळ 11 दिवसांच्या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेची स्वत:ची 24 तासात 1000 आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता असणारी आय.सी.एम.आर. प्रमाणित संपूर्ण टोमॅटिक अशी कोव्हीड-19 विषाणू चाचणी व निदान (आरटीपीसीआर) प्रयोगशाळा 4 ऑगस्ट 2020 पासून कार्यान्वित झाली. त्यापूर्वी कोव्हीड 19 चाचण्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेला शासकीय अथवी खाजगी लॅबवर अवलंबून रहावे लागत होते. त्या लॅबवर इतरही शहरांतील चाचण्यांचा भार असल्याने तपासणी अहवाल प्राप्त होण्यास 3 ते 4 दिवस लागत होते. त्यामुळे कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास अडथळा येत होता. मात्र महानगरपालिकेची स्वत:चीच सुसज्ज आरटी-पीसीआर लॅब कार्यान्वित झाल्याने कोव्हीड 19 चा रिपोर्ट मिळण्याचा कालावधी 24 तासांवर आला. कोव्हीडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जात असताना या लॅबची क्षमता आणखी वाढवून प्रतिदिन 5000 टेस्ट्स इतकी करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने लॅब विस्ताराच्या कार्यवाहीस सुरूवात करण्यात आलेली आहे.