सामाजिक सेवांचे भूखंड सिडको पालिकेला हस्तांतरीत करणार

सिडको, महापालिकेच्या संयुक्तीत बैठकीत शिक्कामोर्तब

नवी मुंबई : नवी मुंबई क्षेत्रामध्ये शासकीय हॉस्पिटल, बालभवन, महिलाभवन, कुस्तीचा आखाडा आणि शुटींग रेंज प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरिता भूखंड उपलब्ध करून देण्यात यावे, याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांची सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी व नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांजबरोबर संयुक्त बैठक नुकतीच सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन येथे संपन्न झाली. सदरबाबत सकारात्मक चर्चा झाली असून सिडकोनेही भूखंड हस्तांतरित करणार असल्याचे सूचित केले आहे.

नवी मुंबईमध्ये सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल उभारण्याकरिता भूखंड उपलब्ध करण्यात आलेला असून सदरबाबतचे गुरुवारच्या बैठकीचे इतिवृत्त, महापालिकेचा अभिप्राय व सिडकोचा अहवाल येत्या सोमवारी मुख्यमंत्री सचिवालयास सादर करण्यात येणार आहे. बालभवन उभारण्याकरिता सीबीडी सेक्टर-2 येथे सामाजिक सेवेतून 11 गुंठेचा भूखंड नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार असून महिलांना स्वयंरोजगारासाठी महिला भवन उभारण्याकरिता सीवूड्स से-48 येथील 891 चौ.मी.चा भूखंड महापालिकेस देण्यास सिडकोने सकारात्मकता दर्शविली आहे. कुस्तीचा आखाडा तयार करण्याकरिता सानपाडा येथे भूखंड आरक्षित करणार येणार असून सदर आखाडा तयार करण्याकरिता आमदार निधीतूनही 25 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

शुटींग रेंज प्रशिक्षण केंद्राकरिताही भूखंडाची मागणी करण्यात आलेली असून त्याकरिता डोंगराळ भागातील भूखंडाचा शोध घेऊन सदर भूखंडही महापालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. सदरबाबत तज्ञ अनुभवी कन्सल्टंट नेमून योग्य ते सर्वेक्षण करून येत्या 8 दिवसांत सदर विषय मार्गी लावणार असल्याचेही सिडको एम.डी. डॉ.संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले. शुटींग रेंज प्रशिक्षण केंद्रासाठी  आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून 25 लाखाच्या निधींची तरतूद करण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. 

  • सिडकोने सरकारी रुग्णालय, बालभवन, महिलाभवन, कुस्तीचा आखाडा आणि शुटिंग रेंज प्रशिक्षण केंद्रांसाठीही भूखंड देण्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी बैठकीत मान्य केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. 
  •  बालभवनसाठी सीबीडी सेक्टर 2 येथील 1100 चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड महापालिकेला हस्तांतरीत केला जाणार आहे. 
  •  महिला भवनसाठी सीवूडस से.48 येथील 891 चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड तर कुस्तीच्या आखाड्यासाठी  सानपाडा येथे भूखंड दिला जाणार आहे.