सिक्कीमच्या मुख्यंमंत्र्यांनी दिली सिडको भवनला भेट

खारघर येथील सिक्कीम भवन भूखंडाची केली पाहणी ; शहरातील सुविधांची केली प्रशंसा

नवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून सिक्कीम भवनाच्या उभारणीकरिता खारघरमध्ये भूखंड निश्चित करण्यात आला आहे.  सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी 05 ऑगस्ट 2021 रोजी सिडको भवनला भेट देऊन सदर भूखंडाची पाहणी केली. तसेच सदर भूखंड सिक्कीम सरकारला प्रदान केल्याबद्दल सिडको तसेच महाराष्ट्र शासनाप्रति आभार व्यक्त केले. 

नवी मुंबईत वेगवेगळ्या राज्याचे भुखंड उभारण्यात आले आहे. वाशीमध्ये आसाम भवन, केरळा भवन, राजस्थान भवन, यासारखे इतर राज्यांच्या भवन उभारण्यासाठी सिडकोने संबंधित राज्यांना भूखंड प्रदान केले आहेत. आता सिडकोकडून खारघर नोडमधील 4000 चौ.मी.क्षेत्र असलेले भूखंड क्र. 19 आणि 20 हे सिक्कीम भवनच्या उभारणीकरिता प्रदान करण्यात आले आहेत. या भूखंडाची पाहणी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी 05 ऑगस्ट 2021 रोजी केली. या भेटीवेळी त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे सदर भूखंड सिक्कीम सरकारला प्रदान केल्याबद्दल सिडको तसेच महाराष्ट्र शासनाप्रति आभार व्यक्त केले. आपल्या भेटी दरम्यान प्रेमसिंग तमांग यांनी नवी मुंबईतील संधानता (कनेक्टिव्हिटी), सार्वजनिक परिवहन, पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक सुविधा क्षेत्रांत होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाबद्दल प्रशंसोद्गार काढले. महाराष्ट्र आणि सिक्कीममधील सहकार्याचे हे पर्व वृद्धिंगत व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. सामाजिक उद्देशांकरिता भूखंड देण्यास सिडकोने आपल्या स्थापनेपासूनच प्राधान्य दिले आहे. सिक्कीम भवनाच्या उभारणीनंतर, येथे येणार्‍या सिक्कीमच्या नागरिकांची निवासाची व्यवस्था होण्याबरोबरच महाराष्ट्र आणि सिक्कीम यांमध्ये एक अनोखा सांस्कृतिक व जिव्हाळ्याचा बंध प्रस्थापित होणार असल्याचे यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. 

सिक्कीम भवनच्या उभारणीसाठी देण्यात आलेल्या या भूखंडामुळे लवकरात लवकर सिक्कीम भवनाचे काम मार्गी लागेल. सिक्कीम भवनाच्या उभारणीमुळे कर्करोगाच्या उपचारांसाठी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये येणार्‍या सिक्कीममधील गरजू नागरिकांच्या निवार्‍याची सोय होणार आहे. कधीकाळी दुर्लक्षित असलेल्या प्रदेशाचे रूपांतर नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये करून शहरातील जमिनीचे मूल्य वाढवण्यासाठी सिडकोने केलेल्या प्रयत्नांचाही मी मनापासून कौतुक करतो.  - प्रेमसिंग तमांग, मुख्यमंत्री, सिक्कीम