281.77 हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे

कोमोठे, पनवेल येथील कांदळवनांच सिडकोने केले हस्तांतरण 

नवी मुंबई ः पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले कांदळवनांचे महत्त्व लक्षात घेता, कांदळवनांचे राखीव वने म्हणून संरक्षण आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने सिडको महामंडळाकडून आपल्या अधिकारक्षेत्रातील, रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील कामोठे येथील 134.30 हेक्टर, पनवेल येथील 38.46 हेक्टर व कोल्हे-खार येथील 109 हेक्टर, अशा एकूण 281.77 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे 05 ऑगस्ट 2021 रोजी वन विभागाच्या कांदळवन कक्षाला हस्तांरण करण्यात आले. 

जमिनीची धूप होण्यापासून वाचवण्यासह पुराचे पाणी व वादळाला अटकाव करण्यामध्ये कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच अनेक पशू-पक्षी व जलचरांचा कांदळवनांमध्ये अधिवास असतो. हे लक्षात घेऊन कांदळवनांना पुरेसे वैधानिक संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून कांदळवन क्षेत्र अधिसूचित करून, सिडकोकडून उपरोक्त कांदळवन क्षेत्राचा ताबा कांदळवन कक्षाला देण्यात आला. निनू सोमराज,  उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई विभाग, डी. एस. कुकडे, वनक्षेत्रपाल, नवी मुंबई तसेच सतिशकुमार खडके, अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (भूसंपादन), सिडको  यांनी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली सदर हस्तांरण प्रक्रिया पार पाडली. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको व इतर अधिकारी हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.    

किनारी भागांकरिता संरक्षक म्हणून कांदळवनांचे महत्त्व असल्याने, कांदळवनांचे राखीव वने म्हणून संरक्षण व्हावे याकरिता सिडकोने आपल्या अधिकारक्षेत्रातील कांदळवन क्षेत्राचे वन विभागाकडे हस्तांतरण केले आहे. नवी मुंबई क्षेत्रात येणारे महत्वाकांक्षी प्रकल्प लक्षात घेता सिडकोचा हा निर्णय नवी मुंबईच्या पर्यावरण रक्षणासाठी व वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे. - डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको