.....तोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आला. भूमिपुत्रांची अस्मिता असलेल्या दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही तोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा इशारा मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला.

नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकर्‍यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी 500 प्रकल्प ग्रस्त, भूमिपुत्र या मशाल मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर दि. बा. पाटील मंगल कार्यालय या ठिकाणी मशाल मोर्चा येऊन थांबला. भूमिपुत्रांची अस्मिता असलेल्या दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही तोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा इशारा सोमवारी (दि. 9) जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला. 15 ऑगस्ट ही डेडलाइन आहे. या तारखेपर्यंत सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर दिबा साहेबांच्या जन्मभूमीत प्रज्वलित करण्यात आलेल्या या मशालीचे रूपांतर 16 ऑगस्टपासून क्रांतीच्या वणव्यात करण्याचा निर्धार या वेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी केला.  मशाल मोर्चा हा 10 आणि 24 जून रोजी झालेल्या नामकरण आंदोलनाच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात जासई येथून मशाल प्रज्वलित करून नेण्यात आली.