डीएव्ही शाळा प्रशासनाविरोधात पालकांचा ठिय्या

इतर शुल्क न घेण्याची मागणी; ठोस निर्णय न घेतल्यास उपोषण

नवी मुंबई : नेरुळ येथील डीएव्ही शाळेने ऑनलाइन शाळा असतानाही शिकवणी शुल्काव्यतिरिक्त भरमसाठ इतर शुल्क आकारले असून यासाठी पालकांकडे तगादा लावला आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी बुधवारी आंदोलन केले. शाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून निदर्शने केली. शाळा प्रशासनाने पालकांकडे आठ दिवसांची मुदत मागितली असून इतर शुल्क रद्द न केल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

शाळा प्रशासन शिकवणीव्यतिरिक्त इतर शुल्क आकारत असून यात र्निजतुकीकरण सहलीसाठीही शुल्क आकारत आहे. मुलेच शाळेत जात नाहीत तर हे शुल्क का द्यावे असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी बुधवारी शाळेला धडक दिली. शाळेसमोर ठिय्या मारत निदर्शने केली. पालकांच्या या आंदोलनाला माजी नगरसेवक भरत जाधव, शिवसेनेचे समीर बागवान, मनसेचे अमोल आयवळे, राष्ट्रवादीच्या सुनीता देशमुख यांनीही पाठिंबा देत आंदोलनस्थळी उपस्थिती दाखवली. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार पालकांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली, मात्र ठरावीक पालकांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला. या बैठकीत पालिका शिक्षण विभागाच्या रेखा पाटील या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. बैठकीत शुल्क वसुलीबाबत चर्चा झाली. मात्र पालकांनी इतर शुल्क रद्द करण्याची मागणी करीत शाळेचा वार्षिक जमा खर्चही दाखवण्याची मागणी केली. परंतु शाळा प्रशासनाने त्यास नकार दिल्याचे पालकांनी सांगितले. इतर शुल्क न घेण्याबाबत पालकांकडे आठ दिवसांचा वेळ मुख्याध्यापकांनी मागितली आहे. यात ठोस निर्णय न झाल्यास शाळेसमोर उपोषण करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.