ऐरोलीतील नवीन मासळी बाजार हटविणार?

मच्छीमारांचे आंदोलन स्थगित

नवी मुंबई : दक्षिण मुंबईतून स्थलांतरित करण्यात आलेला मासळी बाजार नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वाराजवळ   ेेऐरोलीत मांडण्यात आला आहे. मात्र हा बाजार बंद करण्यात यावा यासाठी कोळी महासंघाच्या वतीने गुरुवारी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे मार्केट हटविण्यासाठी मुंबई परिमंडळ सातचे पोलीस प्रयत्न करतील, असे आश्वासन देण्यात आल्याने रात्री दहा वाजता होणारे मच्छीमारांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (क्रॉपर्ड) मधील मासळी बाजार काही दिवसांपूर्वी मुलुंड-ऐरोली नाक्यावरील जुन्या जकात नाक्याच्या जागेत स्थलांतरित करण्यात आलेला आहे. घाऊक मासळीचा हा बाजार रात्री सुरू होऊन पहाटे आवरला जात असतो. या मासळी बाजारामुळे मुलंड, भांडुप, कांजूर मार्ग, ठाणे तसेच नवी मुंबईतील मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर गडांतर आलेले आहे. स्वस्त आणि मस्त मासळी घेण्यासाठी याभागातील नागरिक आता थेट या घाऊक बाजारात जात असल्याने मासे विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.

मुंबईतून आलेले हे मासळी विक्रेत्यामध्ये जास्तीत जास्त हे विनापरवाना धारक मासळी विक्रेते आहेत. त्यामुळे मच्छीमार विक्रेत्यांच्या व्यवसाय अडचणीत आला आहे. या मासळी बाजारामुळे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे हा बाजार हटविण्यात यावा अशी मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी केली आहे. हा बाजार त्वरित हटवावा यासाठी त्यांनी गुरवारी रात्री दहा वाजता या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनात जास्तीत जास्त महिला मासळी विक्रेत्यांचा समावेश राहणार होता. हे आंदोलन होऊ नये यासाठी मुंबई परिमंडळ सातच्या पोलिसांनी हे आंदोलन न करण्याचा सल्ला दिला. यासंर्दभात पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निमाण होणार असल्याने पालिका अधिकार्‍यांशी बोलून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात हा मासळी बाजार हटविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. बाजार इतरत्र हटविणार असल्यास आंदोलन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे पाटील यांनी सांगितले.