मार्केटच्या पुनर्बांधणीचा लवकरच निर्णय

एपीएमसीची बाळासाहेब पाटलांकडून पाहणी 

नवी मुंबई ः एपीएमसीतील कांदा-बटाटा मार्केट 18 वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेने अतिधोकादायक ठरवले आहे. या मार्केटची पुर्नबांधणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, त्यावर आलेल्या सिडको आणि न्यायालयीन आणि व्यापार्‍यांच्या अडचणीमुळे या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नाही. सरकार लवकरच या मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेणार असल्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

मागील अनेक वर्षापासून मुंबई एपीएमसीतील अतिधोकादायक असलेल्या कांदा-बटाटा मार्केटची गुरुवारी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एपीएमसी अधिकारी, व्यापारी आणि संचालकांच्या सोबत पाहणी केली. त्यांनी पाचही मार्केटमधीब समस्यांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे शेतकरी व बाजार समितीचे संचालक व अधिकार्‍यांशी संवाद साधला. 2003 सालापासून एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मधील सात विंग्ज मधील 234 गाळे धोकादायक ठरवले गेले आहेत. यावेळी पणनमंत्र्यांनी या धोकादायक मार्केटच्या पुनर्बांधणीबाबत व्यापार्‍यांनी लवकर प्रस्ताव सादर करावा असे निदेर्र्श दिले. पुढच्या महिन्यात तातडीने कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरच या मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्यातील सर्वच ठिकाणच्या बाजार समित्यांच्या शाखांमध्ये येणारे शेतकरी, व्यापारी व इतर घटक यांना एकत्र घेऊन बाजार समित्यांमधीब आर्थिक उलाढाल सरकार वाढविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. एपीएमसी मार्केटमधील सुरक्षा, इतर मूलभूत सुविधा देण्यासंदर्भात बाजार समितीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये संचालक मंडळ आणि पणन आणि सहकार मंत्री यांच्यामध्ये कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर पणन मंत्र्यांनी धोकादायक असलेल्या मार्गाची पाहणी करुन त्याबाबत न्यायालयीन आदेश आणि सिडको याबाबत तोडगा काढून तातडीने या मार्गाची पुनर्बांधणी कशी करता येईल यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. हे मार्केट एल शेपमध्ये बांधून त्यामधून येणार्‍या निधीतून व्यापार्‍यांना गाळे बांधून देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी पणनमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक डक, प्रभारी संचालक दीपक देशमुख, अधिकारी आणि बाजार घटक उपस्थित होते. 

कोरोना काळात व्यापार पद्दती कोलमडल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. अशा काळात मार्केटला नवसंजीवनी देण्यासाठी सरकारने विविध योजनांची आखणी केली असून विशेष दोन हजार कोटींच्या पॅकेजची तयारी केली असल्याते मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.