जीवरक्षक रूग्णवाहिका महापालिकेच्या ताब्यात

नवी मुंबई ः कोव्हीड विरोधी लढ्याला बळ देण्यासाठी आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीअंतर्गत आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गुरुवारी 9 जीवरक्षक रूग्णवाहिकांचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई पालिकेच्या ताब्यात दिलेल्या या रुग्णवाहिकांमुळे कोरोना व अन्य रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यास मदत मिळणार आहे. 

आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक विकास निधी 2020-21 अंतर्गत पालिकेला  उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांमध्ये 1 अद्ययावत एएलएस आणि 8 पीटीए रुग्णवाहिकांचा समावेश आहे.नवी मुंबई महापालिकेच्या दिघा, रबाळे, खैरणे, पावणे, घणसोली, तुर्भे आणि जुहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असणार आहेत. आधुनिक जीवरक्षक प्रणाली असणारी रुग्णवाहिका पालिका रूग्णालयाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत असणार आहे.  रुग्णवाहिका लोकार्पणाबरोबरच स्पर्धा परिक्षांसाठी पालिका ग्रंथालयांना 4887 पुस्तके व पालिकेच्या विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठांना विरंगुळा साहित्याचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले. 

  • अ‍ॅम्ब्युलन्स मॅन म्हणून नावलौकीक
    समाजकारणाचा वसा घेतलेल्या गणेश नाईक यांचा अ‍ॅम्ब्युलन्स मॅन म्हणून देशात नावलौकीक आहे. 1990 साली ठाण्यात त्यांनी 8 अ‍ॅम्ब्युलन्स अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या हस्ते वितरीत केल्यानंतर 1994 साली त्यांनी 28 अ‍ॅम्ब्युलन्स राज्यातील अनेक दुर्गम भागांसाठी दिल्या होत्या. या अ‍ॅम्ब्युलन्समुळे हजारो रुग्णांचे जीव वाचल्याने अ‍ॅम्ब्युलन्स मॅन म्हणून गणेश नाईकांची देशभरात ओळख निर्माण झाली आहे. 


महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता येणार : फडणवीस             
 नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याचा आघाडी सरकारचा डाव आहे. पराभवाची भीती वाटत असलेल्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे काम या सरकारने सुरू केलं आहे. पण काहीही केलं तरी नवी मुंबई महापालिकेत भाजपचीच सत्ता येईल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीअंतर्गत पालिकेला दिलेल्या रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे सरकार करत आहे. राज्यात जिल्हा बँकेच्या आणि अन्य निवडणुका घेतल्या जातात. ज्या निवडणुका सोयीच्या आहेत त्या घेण्यासाठी निवडणूक आयोगाला सकारात्मक रिपोर्ट दिला जातो. त्या निवडणुका अडचणीच्या आहेत तिथे मात्र कोरोनाची भीती व्यक्त केली जाते. अशा ठिकाणी निवडणुका घेतल्या जात नाहीत. नवी मुंबईमध्ये आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली जनतेची कामे होत आहेत. त्यामुळे उशिरा जरी नवी मुंबई महापालिका निवडणूक घेतली तरी सध्या असलेल्या जागापेक्षा जास्त जागा भाजपाला मिळतील, असा दावा त्यांनी केला.