पावसाळ्यात दही खावं की नाही?

पावसाळा सुरू झाला की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बदल करतो. उन्हाळ्यामध्ये ज्याप्रकारे थंड पदार्थ खाल्ले जातात. त्याच प्रकारे पावसाळ्यामध्ये गारठा वाढत असल्यामुळे शरीराला उष्णता देणार्‍या पदार्थांचा समावेश केला जातो. 

त्याबरोबरच उन्हामध्ये खाल्ले जाणारे ते थंड पदार्थ पावसाळ्यात आहारातून बाद होतात. उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळावा म्हणून दररोज खाल्लं जाणारं दही किंवा ताक पावसाळ्यात मात्र खावं की नाही अशी शंका मनात यायला लागते. दही हे थंड प्रकृतीचं असल्यामुळे पावसाळ्यात दही खाल्ल्यास त्याचे साइड इफेक्ट होऊन सर्दी, खोकला, ताप असे त्रास होण्याची भीती मनामध्ये असते. ज्यांना दररोज दही खायला आवडतं. त्यांना मात्र पावसाळ्यात अडचण होते. 

पावसाळ्यात आहाराकडे जास्त लक्ष द्या असं आयुर्वेद सांगतो. तर आयुर्वेदानुसारच पावसाळ्यामध्ये दही खाऊ नये असंही सांगितलं गेलं आहे. कारण यामुळे वात आणि पित्त संचय वाढतो आणि आरोग्य संबंधी त्रास सुरू होतात. मात्र, डॉक्टारांच्यामते दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असल्याने पावसाळ्यात सुद्धा दही खाणं आवश्यक आहे.

  • पावसाळ्यात दही खाण्याची पद्धत
    दही खाण्यासाठी सकाळची वेळ उत्तम मानली जाते. दिवसाची सुरुवात 1 वाटी दह्याने करू शकतो. यामुळे आपली पचन व्यवस्था चांगली राहते. दह्यात प्रोबायोटिक्स असल्याने आणि त्यात कॅलरीज कमी असल्यामुळे आरोग्यासाठी उत्तम मानले जातं. याशिवाय साध्या दह्यात काही ड्रायफ्रुट्स घालून खाऊ शकता.
  • ताक
    ताक किंवा छाछ हे एक रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात देखील पचनाच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. ताक हे उत्तम पाचक मानलं जातं. कोणताही जड पदार्थ खाल्ल्यावर चांगलं पचन होण्यासाठी ताक जरूर प्यावं.
  • दही रायता
    दही रायता देखील प्रचंड आवडीने खाल्ला जातं. साखर घातलेलं गोड दही खाण्यापेक्षा दही रायता बनवून खावं. यामध्ये खारी बुंदी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असे पदार्थ घालून त्याची चव वाढवता येऊ शकते. दुपारच्या वेळी अशा प्रकारचं रायता खाण्याने फायदा होतो.