परोपकारात भारतीय उद्योजक आघाडीवर!

कॉर्पोरेट नेत्यांच्या यादीत शंभर भारतीयांमध्ये गौतम अदानी, नीता अंबानी आणि कुमार मंगलम यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या समाजकार्यांद्वारे जगभरात छाप सोडली आहे. अमेरिकन संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

या प्रकारची ही पहिली आणि अनोखी यादी अमेरिकास्थित ‘इंडीयस्पोरा’ ने जाहीर केली. या यादीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी, नीता अंबानी आणि कुमार मंगलम बिर्ला यांचा क्रमांक लागतो. मोंटे आहुजा, अजय बंगा आणि मनोज भार्गव हे अमेरिकेचे आहेत. सोनम अजमेरा, बॉब ढिल्लन आणि आदित्य झा हे कॅनडाचे आहेत. यादीनुसार मोहम्मद अमीरसी, मनोज बनाये आणि कुजिंदर बाहिया हे ब्रिटनचे उद्योगपती आहेत.  ‘इंडियस्पोरा’चे संस्थापक श्री. रंगास्वामी म्हणाले की समाजात इतके परोपकारी लोक दिसणं आश्‍चर्यकारक आणि प्रेरणादायी आहे. या सेवाकार्याने समाजाला केवळ प्रेरणाच दिली नाही तर गरजूंच्या थेट कल्याणासाठीही काम केलं. ते म्हणाले की हे व्यावसायिक नेते उदारतेसाठीही ओळखले जातात. सामाजिक समस्यांची जाणीव झाली की उद्योजक आर्थिक मदत करतात. सोमरविले कॉलेजच्या विकास संचालक आणि ज्युरी सदस्यांपैकी एक सारा कलीम म्हणाल्या की या उद्योजकांच्या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या मदतीमुळे आनंद होतो. या यादीतल्या प्रत्येकाच्या सामाजिक कामाच्या चर्चेमुळे आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे मी खूप प्रभावित झाले आहे. मी या दृष्टिकोनाचा आदर करते.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, सुमारे तीन कोटी भारतीय प्रवासी जगातल्या विविध देशांमध्ये राहतात. ही जगातली सर्वात मोठी स्थलांतरित लोकसंख्या आहे. अनेक देशांमधले भारतीय यात सहभागी आहेत. ‘इंडियस्पोरा’च्या २०२१ च्या परोपकारी नेत्यांच्या यादीमध्ये भारतातल्या परोपकारी तसंच अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामधल्या परदेशी भारतीयांचा समावेश आहे. यातल्या अनेक परोपकारींनी कोरोना संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे केला. कठीण काळात खांद्याला खांदा लावून काम करणारे फेअरफॅक्स फायनान्शियलचे संस्थापक प्रेम वत्स म्हणाले की कोरोनाने आम्हाला लोक कठीण काळात खांद्याला खांदा लावून कसं उभं राहतात ते दाखवलं आहे. अशा कठीण काळात व्यावसायिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सरकार आणि विविध संस्था एकत्र काम करतात. समाजाला नवी दिशा देतात. आम्हाला समाजाप्रती जबाबदारीची आठवण करून देतात.

‘इंडियस्पोरा’ची परोपकारी नेत्यांची यादी त्यांच्या सामाजिक कामाची व्याप्ती दाखवून देते. भविष्यात कोणत्याही समुदायाला कोणतीही समस्या असल्यास, सर्व उद्योजक त्यांच्या मदतीसाठी एकत्र येतील. या यादीत स्थान मिळवणार्‍या ‘अर्घ्यम’च्या संस्थापक-अध्यक्ष रोहिणी नीलेकणी म्हणाल्या की भविष्यात स्थलांतरित समाजाला हे उद्योजक अधिक निर्भयपणे दान देत राहतील.