केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त वेगवेगळ्याप्रकारे आंदोलने करत आहेत.16 ऑगस्ट रोजी विमानतळाचे काम बंद आंदोन करण्यात येणार होते. मात्र केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्र्यांनी या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन तात्परते स्थगित करण्यात आल्याचे दि. बा. पाटील नामकरण कृती समितीने रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

विमानतळाला दि.बा. पाटीय यांचे नाव देण्याची आग्रही भुमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली असून या मागणीसाठी 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलन केले. त्यानंतर 24 जूनला सिडको घेराव आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मागणी मान्य न झाल्यास 16 ऑगस्ट रोजी विमानतळाचे काम बंद पाडू असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर शासनाने दखल न घेतल्याने या काम बंद आंदोलनावर समिती ठाम असल्याचे सांगत 9 ऑगस्टला क्रांतीदिनी जासई येथून मशाल पेटवून ही गावागावांत मशाल मोर्चे काढण्यात आले होते. शनिवारी विमानतळ नामकरण समितीची केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री ज्योतीरादित्य सिंधिया व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली. जोतिरादित्य शिंदे यांनी केंद्र सरकार नेहमी भूमिपुत्रांच्या सोबत असल्याचे सांगून अद्याप विमानतळाचे काम पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. तसेच सिडको नामकरणाची घाई का करीत आहे असा सवालही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला भूमिपुत्रांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. त्यानुसार समितीने रविवारी पत्रकार परिषद घेत काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. राज्य सरकारने सिडकोमध्ये केलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव अद्याप दिल्लीत पाठविलेला नसून असा ठराव राज्य सरकारच्या कॅबिनेटने केलाच नसल्याची माहिती कृती समीतीने यावेळी परिषदेत दिली. तसेच विमानतळाचे काम पूर्ण होणे ही प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे कृती समितीने जाहीर केले. मात्र राज्य सरकारच्या कॅबिनेटने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव पुढे पाठविण्याचा प्रयत्न केल्यास भूमिपुत्रांचे हे आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी परिषदेत कृती समितीच्या सदस्यांनी दिला.

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष व माजी खासदार रामशेठ ठाकूर, समितीचे कार्याध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिका उपमहापौर गदीश गायकवाड, जे.डी. तांडेल, नंदराज मुंगाजी, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, दीपक पाटील, मनोहर पाटील आदी समितीचे सदस्य उपस्थित होते.