विवेक पाटील यांची 234 कोटींची संपत्ती जप्त

ईडीची कारवाई ; कर्नाळा क्रीडा अकादमीसह अन्य भूखंडांचा समावेश 

पनवेल ः शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने मंगळवारी ही मोठी कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कर्नाळा क्रीडा अकादमी आणि अनेक अन्य ठिकाणच्या भूखंडांचा समावेश आहे.

कर्नाळा बँकेच्या 529 कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांना जून महिन्यात मुंबई ईडी झोन-2 चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली होती. पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या 529 कोटीच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. 50 हजार 689 ठेविदारांच्या 529 कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु.जी.तुपे यांची नियुक्ती करून पूर्नतपासणी केल्यानंतर 63 कर्ज खात्याद्वारे 512 कोटीचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा 529 कोटीवर गेला आहे. 

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019 मध्ये नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. 2019-20 मध्ये, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड पनवेल मुंबई विरुद्ध ऑडिट करण्यात आले. या ऑडिट दरम्यान असे आढळून आले की बँकेचे तत्कालीन चेअरमन विवेक पाटील हे बनावट खात्याद्वारे त्या बँकेतून पैसे काढत होते आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा क्रीडा अकादमीमध्ये पैसे टाकत होते. या दोन्ही संस्था पाटील यांनीच निर्माण केल्या आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. ईडीच्या तपासादरम्यान असे आढळून आले, ही फसवणूक 2008 पासून सुरू होती. ईडीच्या अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात पीएमएलए ऍक्ट अन्वये करण्यात आलेल्या तपासात ही फसवणूक 67 बनावट खात्यांद्वारे करण्यात आली होती आणि ही फसवणूक व्याजासह सुमारे 560 कोटी रुपयांची होती असल्याचे उजेडात आले. फसवणुकीवर पांघरूण घालण्यासाठी, पैसे वेगवेगळ्या खात्यांद्वारे पाटील यांनी स्थापन केलेल्या नियंत्रित संस्थांच्या अनेक बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा क्रीडा अकादमी आणि इतर वैयक्तिक फायद्यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून क्रीडा संकुल, महाविद्यालय आणि शाळा यासारख्या मालमत्ता बांधण्यासाठी या पैशाचा वापर करण्यात आला.