सुका मेव्याचे दर वाढणार!

नवी मुंबई : एपीपीएमसीत विविध देशांतून सुका मेव्याची आयात होत असून 38 हजार मेट्रिक टन सुकामेवा मार्केटमध्ये अफगाणिस्थानमधून आयात केला जातो. सध्या तालिबानने अफगानिस्थानावर कब्जा केल्याने हजारो कोटींचा सुका मेवा तेथे अडकून राहिला आहे. परिणामी सणासुदीत सुका मेव्याचा तुटवडा भासून भाव वाढण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये देश-परदेशातून मोठ्या प्रमाणात सुकामेवा आयात होतो. शिवाय जवळपास 7 ते 8 हजार कोटी रुपयांची उलाढाल वर्षाला या बाजारात होत असते. तर जवळपास 30 ते 40 व्यापारी अफगाणिस्थानवरून माल आयात करत असल्याने 38 हजार मेट्रिक टन सुकामेवा मार्केटमध्ये अफगाणिस्थानमधून आयात केला जातो. सध्या भारतीय बाजारपेठेत 10 टक्के सुका मेवा शिल्लक आहे. अफगाणिस्थानवर तालिबानने कब्जा केल्याने तेथील व्यवहार बंद झाले आहेत. सुका मेव्याची निर्यात हा तेथील प्रमुख व्यापार आहे. तेथून भारतात अंजीर, जर्दाळू, मनुके, काळे मनुके, शहाजिरा आदी पदार्थांची आयात होते. आगामी काळात तेथील बँकिंग क्षेत्र सुरु न झाल्यास दिवाळीपर्यंत भारतातील सुका मेव्याचे भाव 40 टक्कांनी वधारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, येत्या दोन महिन्यात येणारे नवीन पीक आणि अफगाणिस्थानातील बँकिंग क्षेत्र यावर सुक्यामेव्याची भाववाढ अवलंबून असेल.

घाऊक बाजारात ड्रायफ्रुटचे दर्जानुसार सध्याचे किलोचे दर

काळा मनुका :220-550 रुपये
अंजीर: 200-1400 रुपये
जरदाळू :175-800 रुपये
खजूर : 100-1000रुपये
शहाजिरा : 415-500 रुपये
खरजीरा : 480 रुपये
काळा किशमिश : 280-600 रुपये
हिरवा किशमिश - 200 ते 800 रुपये
चिलकुजा 200 ते 4000 रुपये
पिस्ता 800 ते 1600 रुपये
बदाम 700 ते 1000 रुपये
अक्रोड 800 ते 1000 रुपये
कच्चा हिंग 2000 ते 5000 रुपये