शहरअध्यक्षांनीच फासले मनसेच्या प्रतिमेला काळे

गजाननाच्या खळखट्ट्याकची पत्नीकडूनच पोलखोल

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप करुन त्यासंदर्भात नेरुळ पोलीस स्थानकात तक्रार करुन गुन्हा दाखल केला आहे. मात्र 8 दिवस उलटूनही काळेंना अटक झाली नसल्याने महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकार्‍यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. एरवी लोकांच्या तोंडाला काळे फासणार्‍या मनसेच्या प्रतिमेला शहराध्यक्षांच्या कृत्यामुळे काळे फासले गेल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. 

मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांची पत्नी संजीवनी काळे यांनी त्यांच्यावर मारहाण, जातीवाचक शिवीगाळ व विवाह्यबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार करुन गुन्हा नोेंदविला आहे. मात्र अद्याप काळे यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सेटलमेंटसाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही संजीवनी यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी न्याय मिळण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता गजानन काळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकार्‍यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. महाविकास आघाडीच्या 10 ते 15 महिलांनी गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी आयुक्तालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, मोजक्या महिलांनाच यावेळी गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी परवानगी देण्यात आली. त्यावेळी गृहमंत्र्यांनी या महिलांशी चर्चा केली. त्यामुळे आता गजानन काळे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्याबरोबर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनीही काळे यांच्या अटकेसंदर्भात सूचना पोलीस आयुक्तांना केल्याचे त्यांनी सांगितले. गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनीही काळेंना अटक करण्यासाठी पोलीसांना निर्देश दिले आहेत. गजानन काळे यांच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे. गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली आहे. संजीवनी काळे आणि त्यांच्या परिवाराने मंगळवारी रामदास आठवले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमोर गार्‍हाणे मांडले. 

  • अटकपुर्व जामीनावर होणार सूनावणी
    संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून काळे नवी मुंबई पोलिसांना गुंगारा देत असून अटकपुर्व जामीनासाठी त्यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला असून त्याची शनिवारी सूनावणी आहे. 
  • पोटात ‘गुडगुड’
    गजानन काळे यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने महापालिकेमध्ये तपास सुरु केला आहे. 
    नुकत्याच झालेल्या पालिकेतील वाहन चालक भरतीमध्ये प्रति चालक अडीच लाख रुपये घेऊन 17 लोकांची भरती केल्याचा आरोपाबाबत ही चौकशी सुरु झाल्याने पालिका अधिकार्‍यांसह काही राजकीय पदाधिकार्‍यांच्या पोटात ‘गुडगुड’ होत आहे.