केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

मुख्यमंत्र्यांविरोधातलं वक्तव्य भोवलं

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांविरोधातलं वक्तव्य अखेर भोवलं असून नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर संगमेश्वरमधून नारायण राणेंना पेलिसांनी अटक केलं. 

नारायण राणे यांना अटक केल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं आणि ते राणेंना घेऊन निघाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज स्थानिक कोर्टाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे. नारायण राणे यांना अटक केल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला आहे. 

  • नारायण राणे यांचं वक्तव्य काय होतं
    नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,’ असं नारायण राणे म्हणाले होते.