अनधिकृत बांधकामांवर कारवाई

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील घणसोली विभाग अंतर्गत तसेच कोपरखैरणे विभागात काही ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम सुरु होते. संबंधितांना निष्कासनाची नोटीस देऊनही ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. त्यामुळे पालिकेने या बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली. 

नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे बांधकाम अनधिकृतपणे सुरु केले होते.  भु.क्र.28, सेक्टर-06 घणसोली याठिकाणीही नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता तिसर्‍या मजल्याचे ओपन टेरेस कव्हर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभाग अंतर्गत 1) सफल योग को.ऑफ हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं.27/A, से.11, कोपरखैरणे, 2) गुलमोहर को.ऑफ हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं.27/इ, से.11 कोपरखैरणे, 3) गोकुळधाम को.ऑफ हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं.86, से.11 कोपरखैरणे याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. त्यामुळे अतिक्रमण पथकाकडून सदर बांधकाम पोलीस बंदोबस्तामध्ये निष्कसित करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.