कर्नाळा बँक ठेवींचा हफ्ता भरण्याचे आदेश

डिपॉझिट इन्शुरन्स कंपनीच्या भुमिकेमुळे ठेवीदारांची डोकेदुखी वाढली

पनवेल : रिझर्व्ह बँकेकडून कर्नाळा बँकेचा व्यावसायिक परवाना रद्द करण्यात आल्यानंतर ठेवी परत मिळण्याची अपेक्षा वाटत असतानाच डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कंपनीने मध्येच डोकं वर काढून सप्टेंबरपर्यंत इन्शुरन्सचा हफ्ता भरण्याची अट घातल्याने बँक अवसायनकांसह ठेवीदारांची डोकेदुखी वाढली आहे.

कर्नाळा नागरी सहकारी बँकेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद पाटील यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने 543 कोटीचे उखळ पांढरे करून भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला. त्यामुळे डबघाईस गेलेल्या बँकेच्या ठेवीदारांना गेल्या दोन वर्षात मानसिक त्रास सहन करून उसनवारीवर जीवन जगावे लागत आहे. एप्रिलमध्ये बँकेत पैसे शिल्लक नसताना पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सहकार खात्याकडे तगादा लावला. प्रधान सचिव अरविंद कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे यांची प्रत्यक्ष भेट घेवून बँक वसुलीचे आदेश काढून अंमलबजावणी करून घेत बँकेचा 38 लाखापेक्षा जास्त रकमेचा हफ्ता भरून ठेवी सुरक्षित केल्या होत्या. आता ठेवीदारांना इन्शुरन्सचे पैसे मिळणार, अशी अपेक्षा वाटत असताना डिपॉझिट इन्शुरन्स कंपनीने पुन्हा कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या नाड्या आवळल्या आहेत. त्यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व ठेवींच्या हफ्त्याची रक्कम भरावी असे आदेश काढल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. आधीच कर्नाळा बँक ठेवीदारांना खूप जाच सहन करावा लागला आहे. त्यात हे नवे शुक्लकाष्ठ सुरू झाल्याने ठेवीदार, बँक अवसायनकांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बँकेत तूर्तास इतकी मोठी रक्कम शिल्लक नसल्याने आता हफ्याची रक्कम द्यायची कुठून ही चिंता सतावत आहे.