स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग

नवी मुंबई ः स्वच्छतेचा संकल्प दृढ करण्यासाठी भारत सरकारच्या शहर विकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत ‘स्वच्छता संकल्प देश का - हर रविवार विशेष सा’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांची मोहीम ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक रविवारी राबविण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यास अनुसरून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार 1, 6, 15 व 22 अशा ऑगस्ट महिन्याच्या प्रत्येक रविवारी दिलेल्या संकल्पनेनुसार सर्व विभाग कार्यालय क्षेत्रांत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले व त्यामध्ये व्यापक लोकसहभागावर भर देण्यात आला.

22 ऑगस्टच्या रविवारकरिता देण्यात आलेल्या ‘लिटरींग अँड स्पिटींग से आझादी’ या संकल्पनेनुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले. नारळी पौर्णिमेच्या दिवसाचे औचित्य साधून बेलापूर विभागात एनआरआय मागील बाजूस असलेल्या सागरी किनार्‍याची स्वच्छता मोहीम इन्व्हायरमेंट लाईफ संस्थेच्या सहयोगाने बेलापूर विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी राबविली. तसेच करावेगांव तलावाजवळ नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे व न थुंकणे याविषयी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. नेरूळ विभागात सेक्टर 10 मार्केट भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच दुकानदार व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. वाशी विभागात रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रिक्षा स्टँड परिसरात स्वच्छता मोहीम राबवून रिक्षाचालकांचे व प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले. तुर्भे विभागात सेक्टर 4, 5 व 9 भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली. कोपरखैरणे विभागात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जाणार्‍या सेक्टर 5 व 17 मधील जागांची स्वच्छता करून सुशोभिकरण करण्यात आले व नागरिकांनी कचरा महानगरपालिकेच्या कचरागाड्यांमध्येच द्यावा याविषयी जनजागृती करण्यात आली. घणसोली विभागात आंबेडकरनगर राबाडे भागातील मार्केट क्षेत्रात सफाई मोहीम राबवून दुकानदार व नागरिक यांना पथनाट्य सादरीकरणाव्दारे हसतखेळत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. ऐरोली विभाग कार्यालयाजवळील सेक्टर 3 च्या मार्केट परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच चिंचपाडा भागात पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. दिघा विभागात सुभाषनगर येथे व्यापक लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली तसेच रामनगर भागात पथनाट्याव्दारे मनोरंजनातून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात आला.

यापूर्वीच्या रविवारी देखील 1 ऑगस्ट रोजी ‘गंदगी से आझादी’, 8 ऑगस्टच्या रविवारची ‘घरेलू घातक कचरे से आझादी’, अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्टच्या रविवारी त्या दिवसाकरिता जाहीर केलेल्या ‘सिंगल युज प्लास्टिक से आझादी’ या संकल्पनेनुसार विशेषत्वाने मार्केट क्षेत्रामध्ये जाऊन तसेच फेरीवाल्यांमध्ये सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे उपक्रम सर्वच विभागांमध्ये राबविण्यात आले. लोकसहभागातून स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी नागरिकांचा उत्तम सहभाग मिळत आहे.