नाला बांधणीवरुन शिवसेनेत जुंपली

नवी मुंबई ः ऐरोली येथे 8 कोटी रुपये खर्च करुन नाला बांधणीची निविदा पालिकेने काढली होती. हे काम आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावे म्हणून शिवसेनेचे ऐरोलीतील दोन नेते शड्डू ठोकून होते. परंतु एका नेत्याने दुसर्‍या नेत्याची रिंग तोडल्याने शिवसेनेच्या नेत्यांतच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिकेच्या शहर अभियंता विभागावर दबाव वाढला असून कोणाची मर्जी सांभाळावी या विंवचनेत हा विभाग आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली येथील सेक्टर 3 ते युरो स्कुल दरम्यानच्या नाल्याचे काँक्रिटिकरण करण्याचे काम हाती घेतली होते. हे काम माजी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या प्रभागात असल्याने विशिष्ट ठेकेदाराला काम मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते. परंतु, ज्यावेळी या कामाची निविदा काढण्यात आली त्यावेळी ऐरोली विभागातील शिवसेनेच्या दुसर्‍या तगड्या नेत्याने त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला निविदा टाकावयास लावल्याची चर्चा शिवसेनेत आहे. आधीच या दोन नेत्यांमधून विस्तव जात नसल्याने त्यातच या कामावरुन नवी ठिणगी पडली आहे. 

याकामासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यातील एक निविदा अटी शर्ती पुर्ण करत होती तर अन्य तीन निविदा अटीशर्ती पुर्ण करत नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. या निविदा प्रक्रियेत एकच निविदा आल्याने शहर अभियंता विभागाने निविदा प्रक्रिया नव्याने राबविण्याची तयारी सुरु केली आहे. या तीन निविदा जाणीवपुर्वक बाद करण्यात आल्याचा आरोप संबंधित नेत्याने केला आहे. एकमेकांच्या प्रभागातील कामात हस्तक्षेप न करण्याचा यापुर्वीचा पायंडा संबंधित शिवसेना नेत्याने तोडल्याने आता अन्य नेत्यानेही दुसर्‍या प्रभागात निविदा टाकण्याचे जाहीर केल्याने या दोन शिवसेना नेत्यात जुंपण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुकीत याचा फटका सेेनेला बसण्याची शक्यता वर्तवली आहे. 

  • या वादातून मार्ग काढण्याचे साकडे 
    1. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जुंपल्याने त्याचा फटका सेनेला बसण्याची शक्यता 
    2. या दोन नेत्यांमध्ये आधीच विस्तव आहे. त्यांच्या वादातून मार्ग काढावा यासाठी शिवसेना शहर प्रमुख प्रयत्न करत असून यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेते नाहटा यांना साकडे