मॅट्रोमॉनियलच्या व्यवसायात वाढ

मुंबई ः कोरोनामुळे इतर देशांप्रमाणे भारतातही विवाहावर बंधनं आली आहेत. विवाह सोहळ्यांमधली उधळपट्टी थांबली आहे. मंगल कार्यालय, बँड पथकं, केटरर्स, प्रिंटिंग प्रेस आदींच्या व्यवसायावर परिणाम झाला असला तरी पारंपरिक पद्धतीने मुली पाहण्याच्या कार्यक्रमांना मर्यादा आल्याने ऑनलाईन विवाह स्थळं चालविणार्‍यांचा व्यवसाय मात्र वाढला आहे.

भारतात विवाहाची बाजारपेठ सुमारे तीन लाख 71 हजार कोटी रुपयांची आहे. दर वर्षी हीच बाजारपेठ विस्तारत असते. त्यात सुमारे 25 टक्के वाढ होत असते. परंतु, कोरोना संसर्गामुळे विलासी विवाह सोहळ्यांवर परिणाम झाला आहे. विवाह पुढे ढकलल्यामुळे केटरर्स, मंडपवाले, वेडिंग हॉल, निमंत्रण पत्रिका छापणारे,  फुलांचे हार, बँड-बाजा या सर्व प्रकारच्या व्यवसायांना फटका बसला आहे. आता लग्नाच्या पद्धतीही बदलल्या आहेत. मॅट्रीमॉनियल साइट्सचा व्यवसाय वाढला आहे. दुसरीकडे, ऑनलाईन सेवा सुरू आहेत. लग्न समारंभांतली उलाढाल मंदावली आहे. आघाडीच्या ऑनलाईन साइट मॅट्रीमॉनी डॉट कॉमच्या महसुलात गेल्या एका वर्षात 20 टक्के वाढ झाली आहे. सर्वात जुनी साइट असलेल्या शादी डॉट कॉमच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑनलाइन लग्नासाठी अनेक विवाह प्लॅटफॉर्म सुरू झाले आहेत.

आता झूम वा तत्सम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंध निश्‍चित केले जात आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने वैवाहिक संबंधदेखील निश्चित केले जात आहेत. आता वैवाहिक परिचय परिषदांची संख्या खूप कमी झाली आहे. समोरासमोर बसण्याची किंवा स्टेजवर संभाव्य वधू-वरांची ओळख करून देण्याची गरज नाही. झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालकांच्या उपस्थितीत विवाह आयोजित केले जात आहेत. मुलगा आणि मुलगी एकमेकांची ओळख करून देतात. मॅट्रीमॉनी डॉट कॉमचे प्रमुख मुरुगवेल  जानकीरमन यांच्या मते त्यांचे नवीन व्हिडिओ कॉलिंग वधू-वरांच्या परिचयांसाठी सुरू राहील. व्हिडिओ कॉलिंगमुळे, लोक यापुढे मुला-मुलींना जवळजवळ प्रत्यक्ष पाहू शकतील.

अन्य एक ऑनलाईन साईट जीवन साथी डॉट कॉम’च्या व्हिडिओ मीटिंगमध्ये 11 पटींनी वाढ झाली. कॉलची वेळ दहापट जास्त झाली आहे. प्री-वेडिंग एंगेजमेंट, लेडीज संगीत यासारख्या इव्हेंट अधिकाधिक ऑनलाईन होत आहेत. सर्व व्यवस्था फक्त ऑनलाईन साइटद्वारे सहजपणे केल्या जात आहेत. वेडिंगविशलिस्ट डॉट कॉम’च्या प्रमुख कनिका सुबैया म्हणतात की नवविवाहित जोडपं लॅपटॉपवरील स्क्रीनला स्पर्श करून वडिलांचे आशीर्वाद घेतात. वेडमीगुड’ ऍप सारख्या सेवा मेक अप आर्टिस्ट, फोटोग्राफर,  केटरर्स आणि पुजारी यांची सेवा घेतात. लग्नात उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या घरी आरोग्य कर्मचार्‍यांना पाठवून अनेक कुटुंबांनी कोरोनाची चाचणी करून घेतली आहे.  वेडिंग विशलिस्ट’ने 100 हून अधिक आभासी विवाह आयोजित केले आहेत. काही वेबसाईट्सच्या सेवा नवीन जोडप्यांच्या विवाह बंधनापुरत्याच मर्यादित नाहीत. काही साइट्सनी बेबी शॉवर अर्थात डोहाळे जेवण सोहळा ऑनलाईन करण्यास सुरुवात केली आहे.