लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमधील अट शिथिल

नवी मुंबई ः कोविडमुळे पती मयत झालेल्या महिलांकरीता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दोन विशेष कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाच्या कागदपत्रांमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक होते. ही अट शिथिल करणेबाबत नागरिकांकडून आयुक्तांकडे मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ही अट शिथील करण्यात आली आहे. 

कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना कागदपत्रे जमा करण्यात अधिक अडचणीं येऊ नयेत याचा साकल्याने विचार करून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्राच्या अटीमध्ये अंशत: बदल करीत ‘विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा कुटुंबाचे रेशनकार्ड/ मुलांचे जन्म दाखले/ महिलेचे आधारकार्ड व मयत पुरुषाचे आधारकार्ड यापैकी एका कागदपत्राची छायांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे’ असा बदल केलेला आहे. कोविडमुळे पती गमावलेला आहे अशा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 18 ते 50 वर्ष वयाच्या महिलांनी त्यांच्याकरीता राबविण्यात येणार्‍या 2 विशेष योजना -

(1) कोविड कालावधीमध्ये कोविडमुळे पती मयत झालेल्या महिलेस स्वयंरोजगारासाठी साहित्य संच उपलब्ध करुन देण्याकरिता अर्थसहाय्य करणे - व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलेला संपूर्ण हयातीत एकदा रक्कम रू. 1 लक्ष पर्यंतचे अर्थसहाय्य (दोन टप्प्यात)

(2) कोविड कालावधीमध्ये कोविडमुळे पती मयत झालेल्या महिलेस रू. 1.50 लक्ष अर्थसहाय्य.