ऐरोली नाट्यगृहाच्या कामाची पहिली घंटा वाजली

आ. गणेश नाईक यांच्या हस्ते भुमिपुजन

वाशी : अनेक वर्षांपासून रखडलेल्या ऐरोली येथील नाट्यगृहाच्या बांधकामाचा श्रीगणेशा रविवारी आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. बांधकामाची पहिली घंटा वाजल्याने नाट्यरसिकांसह कलाकारांनाही दिलासा मिळाला आहे. नाट्यगृहाच्या कामासाठी 70 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.  नाईक यांनी नाट्यगृहासाठी आमदार विकास निधीतून 25 लाख रुपयांची घोषणा केली. 

नवी मुंबईतील एकमेव नाट्यगृह वाशी येथे आहे. नाट्यरसिकांची गैरसोय पाहून माजी आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईकरांसाठी आणखी एक नाट्यगृह व्हावे, यासाठी ऐरोलीत सेक्टर 5 भूखंड क्रमांक 37 येथे सिडकोकडून पालिकेसाठी भूखंड हस्तांतर करून घेतला. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा करून नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव स्थायी तसेच महासभेत मंजूर करून घेतला. 2014-15 मध्ये नाट्यगृहाचे बांधकाम सुरू होणे अपेक्षित होते मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि ठेकेदाराने काम सोडून दिल्याने नाट्यगृहाचे काम रखडले. मात्र ते पुन्हा सुरू होण्यासाठी संदीप नाईक यांनी पाठपुरावा केला. पालिकेने मागवलेल्या निविदेला चांगला प्रतिसादही मिळाला. नागपुरमधील मे. सुपर या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. यासाठी 70 कोटींचा खर्च येणार आहे. त्यात आ. गणेश नाईक यांनी 25 लाखांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. संदीप नाईक यांनी यापुर्वी आपल्या आमदारनिधीतून नाट्यगृहासाठी दिलेल्या 30 लाखांच्या भरीव निधीतून आसन आणि ध्वनी व्यवस्था स्थापित करण्यात येणार आहे. कलाकार आणि नाट्य निर्माते यांनी केलेल्या सूचनेनुसार, त्यांनी नाट्यगृहातील आसनक्षमता 550 वरून 310 ने वाढवून 860 करून केली आहे.

 •  नाट्यगृहाची रचना
  अंदाजित खर्च 70 कोटी
  पहिले तळघर - 94 वाहनांसाठी कार पार्किंग 41 वाहनांसाठी दुचाकी पार्किंग
  दुसरे तळघर- 94 वाहनांसाठी कार पार्किंग 41 दुचाकी वाहनांसाठी पार्किंग
  तळमजला - तिकीट घर, महिलांसाठी दोन आणि पुरुषांसाठी दोन प्रसाधनगृहे, रंगीत तालीम कक्ष, मुख्य प्रवेशद्वार आणि प्रदर्शनीय क्षेत्र
  पहिला मजला - मेकअप रूम महिलांसाठी दोन आणि पुरुषांसाठी दोन प्रसाधनगृहे, अपंगांसाठी पुरुष आणि महिलांकरिता प्रत्येकी एक प्रसाधनगृह, उपाहारगृह
  दुसरा मजला - ग्रीन रूम, प्रशासकीय दालन आणि बहुउद्देशीय सभागृह
  तिसरा मजला - अधिकारी कक्ष, प्रसाधनगृह सह अतिथिगृह आणि उपाहारगृह
  चौथा मजला - प्रसाधनगृह सह विशेष अतिथिगृह आणि अधिकारी कक्ष