दीर्घकाळ कोरोना संसर्ग असलेल्यांमध्ये जादा अँटीबॉडीजं

कोरोना संसर्गामुळे दीर्घकाळ आजारी असलेल्यांमध्ये प्रतिपिंडं (अँटीबॉडीज) जास्त असतात. जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. संशोधनानुसार, कोरोनाच्या गंभीर संसर्गामुळे ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये तयार झालेली अधिक प्रतिपिंडं त्यांना भविष्यात पुन्हा अशा संसर्गापासून वाचवतील.

संशोधकांनी या अनुषंगाने 830 लोकांवर संशोधन केलं. यामध्ये 548 आरोग्यसेवक आणि 283 सामान्य लोकांचा समावेश होता. संक्रमणानंतर अँटीबॉडीचा प्रतिसाद, लक्षणं आणि संसर्गाच्या जोखीम घटकांचं निरीक्षण करणं हे संशोधनाचं ध्येय होतं. अभ्यासादरम्यान सहा महिन्यांच्या आत एकूण 548 पैकी 93 लोक संक्रमित झाले होते. त्यापैकी 24 लोकांना गंभीर कोरोना संसर्ग झाला होता तर 14 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नव्हती. एक तृतियांश रुग्णांमध्ये एका महिना लक्षणं दिसली. एकूण दहा टक्के संक्रमित रुग्णांमध्ये चार महिने लक्षणं आढळली.

संशोधन करणारे रटगर्स रॉबर्ट वुड जॉन्सन मेडिकल स्कूलचे संशोधक डॅनियल बी. म्हणतात की गंभीर कोरोना संसर्गामुळे ग्रस्त 96 टक्के रुग्णांमध्ये प्रतिपिंडं अधिक होती. ज्या लोकांमध्ये लवकर लक्षणं दिसली नाहीत, त्यांच्यात कालांतराने अधिक प्रतिपिंडं बनली. शरीरात अँन्टीबॉडीज किती काळ राहतात यावर संशोधन केलं गेलं. इटलीतल्या पडुआ विद्यापीठ आणि लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये हे संशोधन झालं. गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये इटलीत तीन हजार कोरोनाग्रस्तांच्या डेटाचं विश्‍लेषण करण्यात आलं. त्यापैकी 85 टक्के रुग्णांची तपासणी करण्यात आली. मे आणि नोव्हेंबर 2020 मध्ये पुन्हा एकदा रुग्णांची तपासणी करून प्रतिपिंडांची पातळी मोजण्यात आली. तपासात दिसून आलं की फेब्रुवारी आणि मार्चमध्ये संसर्ग झालेल्या 98.8 टक्के रुग्णांमध्ये नोव्हेंबरमध्येही प्रतिपिंडं आढळली होती.

इम्पीरियल कॉलेजचे संशोधक इलेरिया डोरिगती म्हणतात की लक्षणं असलेल्या आणि नसलेल्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीजची पातळी समान होती. हे देखील स्पष्ट झालं की कोरोनाची लक्षणं आणि संसर्ग किती तीव्र होता, याचा अँटीबॉडीजच्या पातळीवर कोणताही परिणाम झाला नाही. कोरोना संसर्गानंतर शरीरात अँटीबॉडीज किती काळ राहतात हा प्रश्‍न नेहमीच चर्चेत असतो. अलीकडील संशोधनात शास्त्रज्ञांनी याचं उत्तर दिलं. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की शरीरात संसर्गानंतर नऊ महिने अँटीबॉडीजची पातळी जास्त राहते. हा दावा इटलीचं पडुआ विद्यापीठ आणि लंडनमधल्या इम्पीरियल कॉलेजने संयुक्तपणे केला आहे. पडुआ विद्यापीठाचे संशोधक एनरिको लावेझो यांच्या मते संशोधनात शहरातल्या ज्या लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी 3.5 टक्के लोकसंख्येला मे महिन्यात संसर्ग झाला होता. यापैकी बहुतेक लक्षणं नसलेले होते. संशोधनादरम्यान, हे उघड झालं की प्रत्येक चार लोकांपैकी एकामुळे त्यांच्या कुटुंबात संसर्ग पसरला.