अकाली प्रसूतीमुळे बाळाला होणारा धोका टाळण्यात यश

अकाली जन्मामुळे नवजात बालकाच्या मृत्यूचा धोका 50 टक्क्यांपर्यंत राहतो. पूर्व-परिपक्व जन्म म्हणजे गर्भधारणेच्या 37 व्या आठवड्यापूर्वी बाळाचा जन्म होणं. अकाली जन्मामुळे बाळाच्या तब्बेतीला असलेला धोका अनेक प्रकारे वाढतो. त्यामुळे अशी प्रसूती रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी चाचणीचा सल्ला दिला आहे.

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की गर्भधारणेच्या दहाव्या आठवड्यात, विशेष प्रकारचे जीवाणू आणि रसायनांची तपासणी करून, नवजात बालकाचा परिपक्व जन्म होईल की नाही हे सांगता येतं. लंडन इथल्या किंग्ज कॉलेजच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या अनुषंगाने प्रा. अँड्र्यू शॅनन म्हणतात की अकाली जन्माचा अंदाज बांधणं अत्यंत कठीण आहे. माझ्या टीमला याचा अंदाज लावण्याचा मार्ग सापडला आहे. त्यामुळे स्त्रीला सतर्क करून धोका टाळता येईल. पूर्व-परिपक्व जन्माचा अंदाज अशा प्रकारे लावला जाऊ शकतो. संशोधन करणार्‍या ब्रिटिश शास्त्रज्ञांना गर्भाशयाच्या तोंडावर काही जीवाणू आणि रसायनं आढळली आहेत. यामुळे संसर्ग आणि जळजळ वाढते. हे संक्रमण आणि जळजळ बाळाच्या अकाली जन्माला जबाबदार असतात.

शास्त्रज्ञांचा विश्‍वास आहे की नवीन चाचणीच्या मदतीने जीवाणू आणि रसायनं शोधून नवजात मृत्यूचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. ब्रिटीश संशोधकांनी संशोधनासाठी यूके रुग्णालयातून 364 मातांचा डेटा घेतला. यापैकी 60 मातांची अकाली प्रसूती झाली. या व्यतिरिक्त, संशोधकांनी 10 ते 15 आठवड्यांच्या गर्भवती महिलांच्या गर्भाशयातून नमुने घेऊन जीवाणू शोधले. सोळाव्या ते तेविसाव्या आठवड्यापर्यंत पुन्हा तपासले. यानंतर गर्भाशयाच्या तोंडाच्या आकाराची लांबी तपासली गेली. शास्त्रज्ञ म्हणतात की महिला गर्भधारणेच्या 34 व्या आठवड्यापूर्वी त्यांच्याकडून घेतलेल्या नमुन्यांमध्ये ग्लुकोज, एस्पार्टेट, कॅल्शियम आणि बॅक्टेरियाची पुष्टी झाली. गर्भाशयाच्या तोंडाला गर्भाशय ग्रीवा म्हणतात. प्रसूतीदरम्यान, नवजात बाळाच्या जन्माच्या वेळी गर्भाशयाचा आकार वाढतो, जेणेकरून बाळ कोणत्याही अडचणीशिवाय बाहेर येऊ शकेल. परंतु, जीवाणू आणि काही रसायनांमुळे या भागात संसर्ग पसरतो. असं होतं तेव्हा गरोदरपणात या भागात सूज येते. जळजळ झाल्यामुळे, गर्भाशयाचं तोंड कमकुवत होतं आणि ते पूर्णपणे उघडण्यास सक्षम रहात नाही. त्यामुळे बाळ बाहेर येताना होणार्‍या समस्या टाळण्यासाठी शस्त्रक्रियेने प्रसूती केली जाते.

अकाली प्रसूतीमुळे बाळामध्ये मृत्यूसह अनेक आजारांचा धोका वाढतो. आणखी एका संशोधनानुसार, भविष्यात अशा मुलांचा बौद्धिक स्तर कमी असू शकतो. सध्या यूकेची आरोग्य संस्था एनएचएस दोन परिस्थितींमध्ये पूर्व-परिपक्व प्रसूतीचा अंदाज वर्तवते. एक म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयाचं नुकसान झालेलं असणं किंवा गर्भाशयाचा आकार लहान असणं. हे गर्भधारणेच्या बर्‍याच काळानंतर शोधलं जातं. परंतु, नवीन संशोधन अधिक उपयुक्त ठरेल. आता गर्भधारणेच्या 10 आठवड्यांच्या आत गर्भाशय ग्रीवेच्या स्थितीवर आधारित, पूर्व-परिपक्व जन्म होईल की नाही हे सांगता येईल. अकाली जन्म टाळण्यासाठी सध्या उपचारांच्या दोन पद्धती आहेत. संप्रेरक औषधाने आणि गर्भाशय ग्रीवा शिवून उपचार केले जातात.